कर्जत : बातमीदार
नेरळ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणार्या मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर फाटक आहे. सोमवारी (दि. 10) दुपारच्या सुमारास टेम्पो पिकअप कार चालकाने हे फाटक उडवून तो फरार झाला. दरम्यान, फाटक नादुरुस्त झाल्याने गेटमनने रेल्वे सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी ते बंद केले. त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नेरळ शहराच्या पूर्वेकडील गावे,वाड्या-पाड्यांना जोडणार्या नेरळ-कळंब राज्यमार्गावर नेरळपाडा येथे रेल्वे मार्गावर फाटक आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एका पिकअप टेम्पो (एमएच-46, एआर-0449) चालकाने या रेल्वे फाटकाला धडक दिली आणि कारवाईपासून वाचण्यासाठी फरार झाला. त्याचा घटनास्थळी उपस्थितीत असलेल्या गेटमनने मोबाइलमध्ये फोटो काढला आहे. याबाबत वाहन चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, या फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर काही वाहने यु टर्न घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करून आपल्या मार्गाला लागत होती.