Breaking News

कर्जत कळंब येथील गोदाम भाताने भरले

नवीन भात खरेदीत अडथळे

कर्जत : बातमीदार

मागील वर्षी खरेदी केलेल्या भाताची जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने उचल केली नसल्यामुळे कळंब (ता. कर्जत) येथील गोदाम भाताच्या पोत्यांनी भरले आहे. त्यामुळे या हंगामात भाताची खरेदी करून साठवण करण्यात नेरळ विविध कार्यकारी सोसायटीला अडथळे येत आहेत.

कर्जत तालुक्यात चार ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीत भात खरेदी केली जाते.नेरळ येथे नेरळ विविध कार्यकारी सोसायटी तर कर्जत आणि कडाव येथे कर्जत खरेदी विक्री संघ यांना जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने हमीभाव भात खरेदी करण्याचे  अधिकार दिले आहेत. कशेळे येथे आदिवासी विकास विभागातर्फे हमीभावाने भात खरेदी केली जाते. नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीकडून भाताची खरेदी करून नेरळ आणि कळंब येथील गोदामांमध्ये  साठवणूक केली जाते. या दोन्ही गोदमांची भात साठवून ठेवण्याची क्षमता 1200 क्विंटल आहे.

नेरळ सोसायटीकडे भात देण्यासाठी तब्बल 1100 शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यामुळे किमान 30 हजार क्विंटल भाताची खरेदी या केंद्रावर होण्याची शक्यता आहे.

सोसायटीने कळंब येथील गोदामात भात साठवून ठेवण्याची तयारी केली आहे.त्यासाठी वजनकाटा आणि मजूरांची तरतूद केली आहे. मात्र कळंब येथील गोदामातील 2021च्या हंगामात खरेदी केलेले भात मार्केटिंग फेडरेशनने अद्याप उचलून नेले नाही. त्यामुळे हे गोदाम जुन्या भाताने पूर्ण भरले आहे. त्यामुळे नेरळ सोसायटीला नवीन भात खरेदी करता येत नाही. याबाबत नेरळ सोसायटीकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला लेखी पत्र देऊन जुन्या हंगामातील भाताची उचल तात्काळ करावी, अशी मागणी केली आहे.

आम्हाला भाताची साठवणूक करण्यासाठी जागा कमी पडत आहे. नेरळ येथील गोदाम खाली करावे, असे वारंवार सांगूनदेखील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून भाताची उचल केली जात नाही. त्यामुळे 10 दिवसांनी गोदाम भाताच्या पोत्यांनी भरणार आहे, त्यावेळी काय करायचे? याचे मार्गदर्शन फेडरेशनने करावे.

-राजेंद्र हजारे-अध्यक्ष, नेरळ विविध कार्यकारी सोसायटी

कळंब येथील जुन्या भाताची उचल आणि सध्या सुरू असलेल्या खरेदी केंद्रातील भाताची खरेदी झाल्यावर तात्काळ त्याची उचल करावी, अशी लेखी सूचना जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला केली आहे.

-विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply