उरण ः रामप्रहर वृत्त
प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1984 साली झालेल्या शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना रविवारी (दि. 16) जासई येथे मान्यवरांनी अभिवादन केले. शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सन 1984मध्ये गौरवशाली आणि शौर्यशाली शेतकरी लढा लढला गेला. या लढ्यात 16 जानेवारी 1984 रोजी नामदेव शंकर घरत (चिर्ले) आणि रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतूम), तर 17 जानेवारी रोजी महादेव हिरा पाटील, केशव महादेव पाटील व कमलाकर कृष्णा तांडेल (सर्व पागोटे) हे हुतात्मा झाले होते. या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्याचा 38वा स्मृतिदिन रविवारी महात्मा फुले सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने जासई येथे झाला. या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, पनवेलच्या उपमहापौर सीताताई पाटील, आगरी समाज मंडळाचे जे. डी. तांडेल, कॉ. भूषण पाटील, ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, उरण पं. स. सभापती समिधा म्हात्रे, उपसभापती शुभांगी म्हात्रे, सरपंच संतोष घरत, माजी सरपंच रजनी म्हात्रे, तसेच सीमा घरत, अरुण घाग, नूरा शेख, सुधाकर पाटील, दिनेश पाटील, वहाळच्या साई संस्थानचे रविशेठ पाटील, अविनाश पाटील, जेएनपीटीचे माजी विश्वस्त रवी पाटील, दिनेश पाटील, जितेंद्र घरत, राजू घरत, प्रकाश ठाकूर, प्रमोद ठाकूर, गोपी म्हात्रे, सुनील घरत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या 96व्या जयंतीनिमित्त रांगोळी, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचे बक्षीस वितरण या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न आणि विशेषत्वाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील साहेबांचे नाव मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.