कोरोना महामारीचा वाढता संसर्ग
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार पालिकेने आधीपासूनच कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेची पूर्वतयारी सुरू केली होती. त्यानुसार कोविड केंद्रातील सर्वसाधारण, ऑक्सिजन बेड्सप्रमाणेच विशेषत्वाने दुसर्या लाटेत कमतरता जाणवलेल्या आयसीयू व व्हेन्टिलेटर्स वाढीकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. त्यानुसार नवी मुंबई पालिका स्वतःचे व खासगी मिळून तब्बल 12 हजार बेड्ससह सज्ज झाली आहे.
दुसर्या लाटेचा प्रभाव कमी होऊ लागल्यानंतर रुग्णसंख्येत होणारी घट लक्षात घेऊन काही कोविड केंद्रे तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली होती. त्यामध्ये सिडको एक्झिबिशन कोविड सेंटर तसेच एमजीएम रूग्णालय सानपाडा कोविड सेंटर, सिडको कोविड सेंटरमधील आयसीयू सुविधा कार्यान्वित होती. तथापि रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली इतर केंद्रेही एकेक करून कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. यामध्ये राधास्वामी आश्रम तुर्भे येथे 358 ऑक्सिजन बेड्स तसेच एक्सोर्ट हाऊस तुर्भे येथे 492 ऑक्सिजन बेड्सची दोन्ही डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली आहेत.
पालिकेच्या कोविड केंद्रांमध्ये 5,164 सर्वसाधारण बेड्सची सुविधा कार्यान्वित करण्याची तयारी आहे. नमुंमपा डेडिकेटेड कोविड केअर सेंटर येथे 3,052 व खाजगी रूग्णालये येथे 1,000 हून अधिक अशा 4,052हून अधिक ऑक्सिजन बेड्सची सज्जता ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने 725 आयसीयू बेड्स आणि खाजगी रूग्णालयातील 475 बेड्स अशाप्रकारे 1200 हून अधिक आयसीयू बेड्सचे नियोजन करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे एकूण 12 हजारहून अधिक बेड्सची सज्जता नवी मुंबई पालिकेने करून ठेवलेली आहे. तशा प्रकारचे निर्देश खाजगी रूग्णालयांनाही देण्यात आलेले आहेत. 24 तास कॉल सेंटरवर सुरू करण्यात आले आहे. दररोज 11 हजारांहून अधिक नागरिकांचे कोविड टेस्टींग करण्यात येत आहे.
सध्या 92.16 टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. प्रिकॉशन डोसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळाला असून 90.27 टक्के मुलांचे लसीकरण झाले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करीत असून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता सुसज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनीही मास्कचा नियमित वापर करून कोरोनापासून स्वत:ला वाचवावे व कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे काटेकोर पालन करून महापालिकेस सहकार्य करावे.
-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका