अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात झालेल्या सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत माणगाव आणि तळ्यामध्ये सत्तापालट झाला आहे. खालापूरमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून पालीत पहिल्या वेळी आघाडीला सत्ता मिळाली आहे. अन्य पोलादपूर, म्हसळ्यात आधीच्याच पक्षांनी आपली सत्ता कायम राखली आहे.
संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माणगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का देत शिवसेना, काँग्रेस, भाजप यांच्या माणगाव विकास आघाडीने 17 पैकी नऊ जागांवर विजय संपादन करून एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत सत्तापालट झाल्याने खासदार सुनील तटकरे आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना धक्का बसला आहे.
विजयानंतर माणगाव विकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत, तसेच घोषणा देत मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी शिवसेना नेते अॅड. राजीव साबळे, दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्षा शर्मिला सत्वे, माजी तालुकाध्यक्ष यशोधरा गोडबोले यांच्यासह विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
माणगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना प्रत्येकी सात जागा, तर भाजप, काँग्रेस आणि शेकापला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. या निवडणुकीत भाजपने प्रथमच खाते उघडले असून वार्ड क्र.5 मधून माणगाव विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार राजेश गोकुळदास मेहता विजयी झाले आहेत.
खालापूर नगरपंचायत निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. एकूण 17 जागांपैकी शिवसेनेला आठ, शेकापला सात, तर दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. या ठिकाणी आता राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
नव्याने स्थापन झालेल्या पाली नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत 17 पैकी 10 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (सहा) व शेकाप (चार) आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आघाडीच्या हाती नगरपंचायतीची सूत्रे आली आहेत, तर शिवसेनेचा चार व भाजपचा दोन जागांवर विजय झाला. या ठिकाणी एका अपक्षानेही बाजी मारली आहे.
म्हसळ्यात 17 पैकी 13 जागा जिंकून राष्ट्रवादीने सत्ता राखली आहे. उरलेल्या चार जागी शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आले आहेत.
पोलादपूर नगरपंचायत शिवसेनेने राखली आहे. 17 प्रभागांपैकी शिवसेनेने 10, काँग्रेसने सहा, तर भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
तळ्यात 17 पैकी 10 जागी विजय मिळवत राष्ट्रवादीने शिवसेनेकडून सत्ता खेचली आहे. शिवसेनेला चार, तर भाजपला तीन जागी यश आले आहे.
भाजपने खाते खोलले
रायगड जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रस्थापित पक्षांना टक्कर देत खाते उघडले आहे. जिल्ह्यात भाजपचे एकूण सात उमेदवार निवडून आले आहेत.
तळा नगरपंचायतीमध्ये भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये दिव्या निलेश रातवडकर, रितेश रवींद्र मुंढे व सुरेखा नामदेव पवार यांचा समावेश आहे. पाली नगरपंचायतीच्या पहिल्यावहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या जुईली श्रीकांत ठोंबरे व गणेश प्रभाकर सावंत यांनी विजय मिळविला. माणगावमध्ये भाजपचे राजेश गोकुळदास मेहता विजयी झाले, तर पोलादपूरमध्ये भाजपच्या अंकिता जांभळेकर यांनी बाजी मारली आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …