नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत रामचंद्र घरत, नगररचना अधिकारी ओवेस मोमीन, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, दीपक पवार, विकास सोरटे, राजू तिकोने, प्रमिला खडसे, तसेच सोसायटीचे अनेक अध्यक्ष, सेक्रेटरी उपस्थित होते. सदर बैठकीत मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास, हायराइज कमिटीने लवकरात लवकर निर्णय घेणे, सोसायटींच्या बांधकाम परवानग्या, एक खिडकी योजना अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात वाशी जे-1, जे-2, सी टाईप व नेरूळमधील सिडकोनिर्मित सोसायटीमधील नागरिक यांनी माझ्या निवासस्थानी येऊन भेट घेतली होती. नागरिकांनी त्यांच्या सोसायटीमार्फत नवी मुंबई महानगरपालिकेकडे पुनर्विकासासाठी अनेक प्रस्ताव सादर केले आहेत. त्यासंदर्भातील नवी मुंबई
महानगरपालिकेकडून होणारी दिरंगाई यासाठी पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेऊन सदरबाबत चर्चा करण्यात आली. पुनर्विकासाबाबत नागरिक अनभिज्ञ असून पालिकेने सदरबाबत जनजागृती करावी, असे आ. म्हात्रे यांनी पालिका आयुक्त यांना सांगितले.
– सिडकोने त्यांच्या नियमानुसार अनेक सोसायट्यांना ना-हरकत प्रमाणपत्रे दिली आहेत, परंतु पालिकेकडे प्रस्ताव सादर केल्यानंतरही सदर प्रस्ताव मंजुरीविना अडकून ठेवले आहेत. सदरबाबत पालिका उदासीनता दाखवीत असून ही अत्यंत खेदाची बाब आहे. येत्या 26 तारखेला हायराइज कमिटीची बैठक होणार असून त्यामध्ये शहरातील पुनर्विकासाबाबत विचारविनिमय होणार आहे व त्यानंतर बांधकाम परवानगी देण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सूचित केले आहे.
-आमदार मंदा म्हात्रे