Monday , February 6 2023

दलित, ओबीसी, महिला मंत्री झाल्याने विरोधक आनंदी नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (दि. 19) पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळातील नव्या सदस्यांची ओळख करून देत असताना विरोधकांनी गदारोळ घातला. त्यावर दलित, ओबीसी, महिला मंत्री झाल्याने काही जण आनंदी नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले.
‘मला वाटले होते की, इतक्या महिला, दलित, आदिवासी मंत्री झाल्याने संसदेत उत्साह असेल. या वेळी कृषी, ग्रामीण, ओबीसी समाजातील सहकार्‍यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे, पण काही लोक महिला, ओबीसी आणि शेतकर्‍यांच्या मुलांना मंत्री होण्याची संधी दिल्याने आनंदी नाहीत. यामुळे त्यांची ओळख करून देण्याची परवानगी ते देत नाही आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हे संसदेच्या परंपरेला धरून नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला. चांगल्या पंरपरा तोडल्या जात आहेत. सर्वांत मोठी लोकशाही असणार्‍या देशाच्या संसदेत असे वागणे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.
लस घेऊन बाहुबली व्हा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशन सुरू होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाविरुद्ध आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे ते म्हणाले. लस घेताच कोरोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असे सांगत त्यांनी लस घेण्याचेही आवाहन केले. आतापर्यंत 40 कोटींपेक्षा जास्त लोक करोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत. पुढेही हे काम जोरात सुरू राहिल, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply