Breaking News

खांदा कॉलनीमध्ये कोविड रुग्णालय सुरू करा

संजय भोपी यांची महापालिकेकडे मागणी

पनवेल : बातमीदार

खांदा कॉलनीमध्ये कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता महापालिकेच्या वतीने खांदा कॉलनीत कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी प्रभाग ‘ब’ चे सभापती संजय भोपी यांनी पालिकेकडे केली आहे.

मागील काही दिवसांपासून पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 बाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वच कोविड रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता जाणवत आहे. खांदा कॉलनी विभागांमध्ये ही दिवसेंदिवस रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत असून परिसरात कोविड-19 उपचारार्थ हॉस्पिटल उपलब्ध नसल्याने खांदा कॉलनीमधील नागरिकांना बेड मिळवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

बेड मिळेपर्यंत रुग्णास नाईलाजाने घरीच रहावे लागत असल्याने परिवारातील तसेच आजूबाजूच्या रहिवाशांना संसर्ग होऊन त्यात भर पडत आहे. खांदा कॉलनी विभागातील वाढती रुग्ण संख्या पाहता परिसरात कोविड रुग्णालय असणे अतिशय गरजेचे झाले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून ही आग्रही मागणी करण्यात येत आहे.

या संकटाला सामोरे जात असताना सर्वांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे व उपचाराचा हॉस्पिटलमधील लाखो रुपयांचा खर्च हा अनेकांच्या आवाक्याबाहेरचा आहे. यामुळे खांदा कॉलनी विभागातही पनवेल महापालिकेतर्फे कोविड 19 रुग्णालय सुरू करण्यात यावे, जेणेकरून स्थानिक कोरोना बाधित रुग्णांची उपचारासाठी होत असलेली गैरसोय टाळता येईल. यासाठी आवश्यकता भासल्यास एखादा लग्न समारंभ व कार्यक्रमासाठीचा हॉल अथवा हॉस्पिटलचा वापर करण्यात यावा, असे संजय भोपी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply