संतप्त प्रवाशांचा सवाल
कर्जत ः बातमीदार
मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन स्थानकात 2003मध्ये पादचारी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी दोन्ही बाजूला पिलर उभे करण्यात आले असून पुलाचे काम अनेक वर्षे थांबले आहे. दरम्यान, नेरळसारख्या जंक्शन रेल्वे स्थानकात सध्या एकच पादचारी पूल अस्तिवात असून मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असलेल्या रेल्वेस्थानकात मात्र एकमेव पादचारी पुलामुळे प्रवाशांची तारांबळ उडते. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता अर्धवट अवस्थेत असलेल्या पादचारी पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. नेरळ स्थानकातून माथेरान या पर्यटन स्थळासाठी नॅरोगेज मार्ग जातो. 1907मध्ये अस्तित्वात आलेल्या नॅरोगेज मार्गामुळे जंक्शन स्थानकाचा दर्जा मिळालेल्या नेरळ स्थानकात मात्र सुविधांचा अभाव आहे. माथेरानला जाण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार हे 2003मध्ये नेरळ स्थानकात आले होते. त्यावेळी त्यांचा छोटेखानी सत्कारही करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात नेरळसाठी संगणकीय आरक्षण केंद्र व पादचारी पूल बनविण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच मुंबई एण्डकडे नेरळ स्थानकात पादचारी पुलाच्या निर्मितीचे काम सुरू झाले होते. वर्षभरात दोन्ही फलाटांवर पिलरही उभे राहिले. पादचारी पुलासाठी गर्डरही टाकण्यात आले होते. फलाट एकवर पिंपळाच्या झाडाच्या बाजूला पादचारी पूल उतरणार होता व तेथून स्थानक परिसरातून बाहेर पडण्यासाठी रस्ताही बनविण्यात आला होता. फलाट दोनबाहेर रिक्षा स्थानक व टॅक्सी स्थानक बनवून तेथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी पूर्ण झाली होती. पुलासाठी केवळ पॉवर ब्लॉक घेण्याचा अवधी शिल्लक असताना पुलाचे काम बंद झाले ते आजपर्यंत बंदच आहे. नवीन पादचारी पूल लवकर तयार व्हावा यासाठी प्रवासी पाठपुरावा करीत होते, मात्र आजतागायत नेरळ रेल्वेस्थानकातील पादचारी पूल पूर्ण होण्याचे नाव घेत नाही, तर त्यानंतर कर्जत एण्डकडे नवीन पादचारी पूल तयारही झाला असून हा पादचारी पूल एका टोकाला असून मुंबई एण्डकडे उतरणार्या प्रवाशांना त्या पादचारी पुलाचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे मुंबई एण्डकडे नवीन पादचारी पुलाची मागणी सातत्याने होत आहे. आजूबाजूच्या शेलू, भिवपुरी रोड, कर्जत स्थानकात दोन दोन पादचारी पुलांची निर्मिती करण्यात आली आहे. मग नेरळसारख्या जंक्शन रेल्वे स्थानकात पादचारी पूल कधी उभा राहणार, असा सवाल संतप्त प्रवासी करीत आहेत.
नितीश कुमार रेल्वेमंत्री असताना आले असता नेरळ स्थानकात पादचारी पूल व्हावा म्हणून आम्ही मागणी केली होती. तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करीत होतो, मात्र पादचारी पुलाचे काम का रखडले, हे अद्याप समजू शकले नाही.
-मिलिंद साने, माजी अध्यक्ष, नेरळ रेल्वे प्रवासी संघटना
नेरळ ग्रामपंचायत शिष्टमंडळाने तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निवेदन दिले होते. त्या वेळी पुलाचे काम सुरू झाले, पण आजतागायत पूल पूर्ण झाला नाही. त्या कामाच्या पूर्णत्वासाठी आम्ही अनेकदा पाठपुरावा केला, मात्र मध्य रेल्वेकडून कोणत्याही पत्राला उत्तर मिळाले नाही.
-आयुब तांबोळी, माजी सरपंच
या पुलाच्या कामात काही त्रुटी निर्माण झाल्याने पादचारी पुलाचे काम थांबविले होते. त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित असून पादचारी पूल मुंबई एण्डकडे तयार झालेला असेल.
-वाय. पी. सिंग, सेक्शनल इंजिनियर, कल्याण विभाग