उपोषणाला बसण्याचा इशारा
खारघर : रामप्रहर वृत्त
मागील पंधरा दिवसांपासून खारघर सेक्टर 12 जी टाईपमधील वसाहतीत दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. या तांत्रिक दोषाचे निवारण लवकर होत नसल्याने खारघर भाजप मंडलाच्या शिष्टमंडळाने पाच दिवसांत यावर उपाय निघाला नाही किंवा संपूर्ण पाईपलाईन बदलाचा निर्णय घेतला गेला नाही, तर सिडको कार्यालय सेक्टर चार येथे उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अनेक नागरिक उलट्या, जुलाब व पोटदुखीमुळे त्रस्त झाले आहेत. काही नागरिक दवाखान्यात अॅडमिट झालेले आहेत. यासंदर्भातील प्रिस्क्रिप्शन निवेदनासह सिडको अधिकारी चेतन देवरे यांना देण्यात आले. स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, हर्षदा उपाध्याय व उपाध्यक्ष रमेश खडकर यासंदर्भात पाठपुरावा करीत आहेत.
सरचिटणीस दीपक शिंदे यांनी या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जिवाशी बेतले तर याला सर्वस्वी सिडको प्रशासन जबाबदार असेल शिवाय नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा सिडकोला काही अधिकार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. उपोषणासंदर्भाचे निवेदन पत्र देताना मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल सरचिटणीस दीपक शिंदे व उपाध्यक्ष दिलीप जाधव उपस्थित होते.