Breaking News

सुरक्षारक्षक तैनात करून पांडवकडा धबधबा पर्यटनासाठी खुला करावा

खारघर-तळोजा भाजप मंडलची सिडकोकडे मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर येथील पांडवकडा धबधबा परिसरात यंदाही पर्यटकांना शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. येथे होणार्‍या दुर्घटनांमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे, पण योग्य प्रकारे सुरक्षारक्षक तैनात करून पावसाळ्याच्या चार महिन्यांपुरता हा परिसर पर्यटनासाठी खुला करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलातील नगरसेवक व पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 18) सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सह्याद्रीच्या मूळ डोंगररांगांपासून विलग झालेल्या एका डोंगराच्या कुशीत असणारा खारघरचा जणू मुकुटमणी म्हणजे पांडवकडा धबधबा. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा हा धबधबा व आजूबाजूचा नयनरम्य निसर्ग परिसर लाखो पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. पाऊस चांगला रूळला की पर्यटकांचा ओघ पांडवकड्याकडे चालू होतो, मात्र येथे होणार्‍या दुर्घटनांमुळे यंदाही पर्यटकांना घालण्यात आली आहे. परिणामी पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
वास्तविक, पांडवकडा परिसरात सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून इतरही सुविधा येणार्‍या पर्यटकांना पुरवेल अशा संस्थेची चार महिन्यांसाठी नियुक्त केल्यास पर्यटकांना सुरक्षितपणे या निसर्गरम्य परिसराचा आश्वाद घेता येईल. त्याचप्रमाणे पर्यटकांमुळे स्थानिकांना चार महिने रोजगार उपलब्ध होईल, असे भाजपच्या शिष्टमंडळाने नमूद केले आहे.
याबाबत सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे म्हणाले की, पांडवकडा क्षेत्र वनखात्याच्या अखत्यारित येत असून त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल.
भाजपच्या शिष्टमंडळात मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, सरचिटणीस किर्ती नवघरे, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, उपाध्यक्ष संध्या शारबिद्रे, मंडल उपाध्यक्ष बिना गोगरी, माजी नगरसेवक गुरूनाथ गायकर, वासुदेव पाटील, वैशाली प्रजापती, गुरूनाथ म्हात्रे, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी आदी उपस्थित होते. या निवेदनाची प्रत पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनाही देण्यात आली आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply