Breaking News

माणगावकरांना मिळणार शुद्ध व मुबलक पाणी!

वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार; मंजुरीची प्रतीक्षा
माणगाव : प्रतिनिधी
वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन माणगाव नगरपंचायतीने अमृत 2.0 अंतर्गत 60 कोटी रुपये खर्चाच्या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार केला असून ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर माणगावकरांना शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.
माणगावमध्ये सध्या अस्तित्वात असलेली नळ पाणीपुरवठा योजना सुमारे 40 वर्षांपूर्वीची जुनी असून या योजनेतून नगरपंचायत हद्दीमध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाणीपुरवठा योजनेमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले, मात्र शहरात पुरशा दाबाने व सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. तालुक्यातील वाढत्या औद्योगिकरणाचा परिणाम माणगाव शहरात जाणवू लागला असून शहरीकरणाबरोबरच नागरिकरणही झपाट्याने वाढत आहे. माणगाव शहराच्या चारही आजूबाजूने नद्या असून त्या नद्यांत पुरेसे पाणी असते. मात्र माणगाव ग्रामपंचायतीच्या काळातील पाणी योजना 40 वर्षानंतरही कायम राहिली आहे. दरम्यान, माणगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले असून नगरपंचायतीमध्ये खांदाड, माणगाव, भादव, नाणोरे उतेखोल अशा पाच गावांचा समावेश आहे. शासनाच्या पाणीपुरवठा वितरणाच्या निकषांनुसार प्रति माणसी प्रति दिन 75 लिटर पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे, मात्र जुनी पाणी योजना कमी पडत असल्याने शहराच्या काही भागात अपुरा व अनियमीत पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत होता.
सन 2011च्या जनगणनेनुसार माणगाव शहराची लोकसंख्या 18 हजार 740 इतकी होती. यात वाढ होवून आत सुमारे 25 हजार लोकसंख्या झाली आहे. पुढील 20 वर्षाचा विचार करून माणगाव नगरपंचायतीने नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेत तीन पाणी साठवण टाक्या उभारून प्रतीदिन 35 लक्ष लिटर्स क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची तरतूद आहे. त्यासाठी 60 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर जुन्या व नवीन जलशुद्धीकरण यामधून प्रतीदिन 65 लक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नगरपंचायत हद्दीतील सर्वात शेवटच्या घरापर्यंत शुद्ध व मुबलक पाणी मिळणार आहे. शहरी भागात माणसी 135 लिटर पाणीपुरवठा होणार आहे, मात्र या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेची नागरिकांना आणखी कांही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
माणगावचे वाढते नागरिकरण पाहता जुनी पाणी योजना अपुरी पडत आहे. 60 कोटी रुपये खर्चाचा नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच वाढीव पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. -संतोष माळी, मुख्याधिकारी, माणगाव, नगरपंचायत

Check Also

माथेरानमध्ये नव्याने दाखल होणार्‍या ई-रिक्षा हातरिक्षाचालकांना मिळतील -आमदार प्रशांत ठाकूर

कर्जत ः प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलावर्गाच्या सक्षमीकरणासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवत आहेत. त्यामुळे महिलाशक्तीला …

Leave a Reply