Breaking News

भारतीय संघात निवड झालेल्या रायगडातील तायक्वांदोपटूंना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून दोन लाखांची मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय तायक्वांदो संघात निवड झालेल्या रायगड जिल्ह्यातील सहा खेळाडूंना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 29) जाहीर केले. या खेळाडूंनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेत आशीर्वाद घेतले.
नाशिक विभागीय क्रीडा संकुल येथे इंडिया तायक्वांदो आयोजित चॅम्पियन ऑफ चॅम्पियन अंतिम फेरी, कॅडेट जागतिक तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा तसेच कॅडेट आणि ज्युनिअर आशियाई तायक्वांदो स्पर्धा निवड चाचणीकरिता अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगडच्या अटॅकर्स, गुरुकुल आणि वीर तायक्वांदो अकॅडमीमधील एकूण 22 खेळाडू पात्र झाले होते. या निवड चाचणीमधील विजेत्या खेळाडूंची भारतीय तायक्वांदो संघासाठी पात्र झाले आहेत. गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीतील राज जाधव, ध्रुव शेट्टी आणि साई जाधव यांची कॅडेट सांघिक मुले, तर किरण कदम, निशीता पाडेकर आणि संस्कृती पाटील यांची जुनियर सांघिक मुली या गटांत प्रथम क्रमांक पटकावून 2 ते 9 सप्टेंबरदरम्यान लेबनॉन येथे होणार्‍या आशियाई तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या पनवेल येथील निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक करीत आशियाई स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच दोन लाख रुपये श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
या वेळी माजी नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक तुषार सिनलकर, तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगडच्या अध्यक्ष अ‍ॅड. प्रज्ञा भगत, उपाध्यक्ष संजय भोईर, सचिव सचिन माळी, खजिनदार रोहित सिनलकर आदी उपस्थित होते.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply