पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावात माहेरवाशिणींचा आदर सत्कार व हळदीकुंकू समारंभ रविवारी (दि. 30) आयोजित करण्यात आला होता. ‘माहेरवाशीण तू कुंडेवहाळ गावची’ या नावाने हा कार्यक्रम कुलुमाता मंदिरात उत्साहात झाला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेविका दर्शना भोईर, भाजप उलवे नोड महिला अध्यक्ष योगिता भगत, दापोलीच्या सरपंच प्रशाली डाऊर, मानघरच्या सरपंच संगीता पाटील, नानोशी ग्रामपंचायत सदस्य विनंती पाटील आदी उपस्थित होत्या. कुंडेवहाळ गावातील ज्या मुली लग्न होऊन सासरी गेल्या आहेत, त्यांचा आदर सत्कार करण्यासाठी त्यांना एकत्रित गावात बोलविण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त गावातील माहेरवाशिणींनी जुन्या मैत्रिणींसोबत विचारांची देवाणघेवाण, जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि या अभिनव उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, तेजस्विनी महिला ग्रामसंघ, सर्व महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी सहकार्य करणार्या युवकवर्गाला, ग्रामस्थांना, विविध स्वरूपात देणगी देणार्यांना आयोजकांनी धन्यवाद दिले. कुंडेवहाळ ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन जवळपास 400हून माहेरवाशिणी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांची उत्तम व्यवस्था ग्रामस्थांनी केली होती. त्यांना तिळगूळ, पुरणपोळीचे गोडाधोडाचे जेवण देऊन हळदीकुंकवाचे वाण देण्यात आले. त्यामुळे माहेरवाशिणी भारावून गेल्याचे पहावयास मिळाले. हा एक अनोखा कार्यक्रम पहिल्यांदाच कुंडेवहाळ गावात झाल्याने परिसरातील गावच्या ग्रामस्थांनी कौतुक करून असा कार्यक्रम आपल्याकडे घेण्याचा मानस व्यक्त केला आहे.