Breaking News

‘पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घ्यावा’

मुंबई ः प्रतिनिधी

नक्षली हल्ला, दुष्काळी उपाययोजनांसाठी गुरुवारी (दि. 2) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलविली होती. या वेळी बुधवारी नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 15 जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्पण करण्यात आली, तसेच राज्यातील दुष्काळी स्थितीचा, राज्य सरकारतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या मदतीचा सविस्तर आढावा घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  

राज्यातील 12,116 गावांमध्ये 4774 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 2016मध्ये याच सुमारास 9579 गावांमध्ये 4640 टँकर्स लागले होते. सुमारे 8.5 लाख पशुधनासाठी 1264 चारा छावण्या लावण्यात आल्या आहेत. एकूण 82 लाख शेतकर्‍यांपैकी 68 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात आतापर्यंत 4412.57 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या वतीने दुष्काळ निवारणासाठी 4714.28 कोटी रुपये मदत देण्यात आली असून, राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात 3400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सुमारे 3200 कोटी रुपये पीकविम्याच्या मदतीपोटीसुद्धा देण्यात येत असून, त्यापैकी 1100 कोटींचे वाटप पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

याशिवाय प्रत्येक पालकमंत्र्यांना दुष्काळग्रस्त भागात भेटी देऊन प्रत्यक्ष आढावा घेण्याचे निर्देशही या वेळी देण्यात आले आहेत. चारा छावण्यांना भेटी देणे, टँकर्सची स्थिती पाहणे आदींचा आढावा घेण्यासही

त्यांना सांगण्यात आले आहे. स्थलांतर रोखण्यासाठीसुद्धा उपाय हाती घेण्यात आले असून, रोजगार मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मान्सूनच्या अंदाजाचा या वेळी आढावा घेण्यात आला. पाऊस थोडा विलंबाने आल्यास करावयाच्या उपाययोजनांचादेखील यावेळी आढावा घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply