प्रो कबड्डी लीग
बंगळुरू ः वृत्तसंस्था
प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी पुणेरी पलटण आणि यू मुंबा या महाराष्ट्राच्या दोन संघांत अटीतटीचा सामना पहायला मिळाला. यात पुण्याने मुंबईचा 36-34 असा पराभव केला आणि आठव्या विजयासह गुणतालिकेत सातव्या स्थानावर झेप घेतली. मुंबईने संघाही या सामन्यातून एक गुण मिळवला.
या सामन्यात पुणेरी पलटणने सामन्यात चांगले पुनरागमन करीत विजय मिळवला. पुण्याकडून मोहित गोयतने नऊ आणि अस्लम इनामदारने आठ गुण घेतले. व्ही. अजितचा सुपर 10 यू मुंबासाठी व्यर्थ गेला, तर अभिषेक दुसर्या हाफमध्ये फ्लॉप ठरला. बचावात फक्त रिंकूच छाप पाडू शकला आणि त्याने चार टॅकल पॉइंट घेतले.
त्याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाचा 37-35 असा पराभव करीत नववा विजय मिळवला, तर यूपीचा 16 सामन्यांमधील हा आठवा पराभव ठरला. यूपीने सुरुवातीपासूनच स्टार रेडर प्रदीप नरवालला वगळले. त्यामुळे संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
पहिल्या हाफनंतर पाटणा संघ 20-15 असा आघाडीवर होता. 12व्या मिनिटाला पाटणाने यूपीला ऑलआऊट केले. यूपीने पूर्वार्ध संपण्यापूर्वी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ते पाच गुणांनी मागे राहिले. उत्तरार्धाच्या सुरुवातीला यूपीने पाटणाला ऑलआउट करीत जबरदस्त पुनरागमन केले व स्कोअर 21-21 असा केला. पुढील काही मिनिटांत यूपीनेही आघाडी घेतली आणि सुरिंदर गिलने सुपर 10 पूर्ण केला, मात्र यानंतर सचिननेही सुपर 10 पूर्ण करून पाटणाला आधार दिला. 33व्या मिनिटाला पाटणाने गुणफलक 28-28 असा केला.
36व्या मिनिटाला प्रदीप नरवाल यूपीचा बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला, पण तो आधीच चढाईत बाद झाला आणि पाटणाने यूपीला ऑलआऊट करून चार गुणांची आघाडी घेतली. प्रदीपने दुसर्या चढाईत दोन गुण मिळवले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. यूपीकडून सुरिंदर गिलने 10 आणि श्रीकांत जाधवने नऊ गुण घेतले.