Breaking News

हार्दिक पांड्यासोबत कोणतीही स्पर्धा नाही -शार्दुल ठाकूर

मुंबई ः प्रतिनिधी

टीम इंडियातील अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरची वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी निवड झाली असून तो अहमदाबादला पोहचला आहे. शार्दुल स्वत: अष्टपैलू खेळाडू असल्याचे मानतो तसेच हार्दिक पांड्यासोबत कोणतीही स्पर्धा नसल्याचेदेखील त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

‘मी स्वत:ला एक चांगला अष्टपैलू खेळाडू मानतो. जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी स्वत:ला सिद्ध करू इच्छितो. फलंदाजीसाठी सातव्या क्रमांकावर धावा करणे, मोठी भागीदारी रचणे आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून देणे महत्त्वाचे असते. यामुळे खूप फरक पडतो, असे शार्दुल ठाकूरने सांगितले. यावेळी शार्दुलला हार्दिक पांड्यासोबत तुलना होते का, असा प्रश्न विचारला. त्यावर शार्दुलने आपल्या शैलीत उत्तर दिले. तो म्हणाला, माझी हार्दिकसोबत कोणतीच स्पर्धा नाही. हार्दिक तंदुरूस्त होऊन संघात लवकरच परतेल. आमच्या दोघांची फलंदाजी करण्याची शैली वेगळी आहे. हार्दिक पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. मी सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर येतो. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कोणतीच स्पर्धा नाही. मी त्याची जागा घेण्याचा विचार करत नाही. मी जिथपर्यंत हार्दिकला ओळखतो त्याने मला पाठिंबाच दिला आहे. तो त्याचे अनुभव माझ्यासोबत शेअर करतो, मीही तसेच करतो. मर्यादित षटकांच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू असणे संघासाठी चांगले असते.

फलंदाजी करणे मला आवडते, पण मला फलंदाजी करण्याची तितकी संधी मिळाली नाही खासकरून रणजी ट्रॉफीत. जेव्हा मला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली तेव्हा मी गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली केली. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी मला सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. मी नेटमध्ये फलंदाजीचा सरावही करतो. संघात तळाच्या फलंदाजांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने ही रणनीती वापरत वर्षानुवर्ष चांगली कामगिरी केली आहे, असेही शार्दुलने या वेळी नमूद केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply