खारघर : रामप्रहर वृत्त
येथील पनवेल महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर शेड बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामासाठी नगरसेवक निलेश बावीस्कर यांनी केलेल्या मागणीनुसार पनवेल महापालिकेच्या महासभेत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार शेड उभारणीच्या कामाचे भूमिपूजन महापालिकेचे स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
पनवेल महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी नागरिकांना लसीकरणासाठी आल्यावर बाहेर उभे राहावे लागते. पावसाळ्यात आणि उन्हामध्ये नागरिकांना लसीकरणासाठी बाहेर उभे राहावे लागायचे. त्यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीकोनातून येथील नगरसेवक निलेश बावीस्कर यांनी पनवेल महापालिकेकडे शेड उभारणीच्या कामासाठी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिकेच्या महासभेत हा विषय मांडून शेड उभारणीच्या कामाला मान्यता मिळवून दिली. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर नागरिकांसाठी शेड उभारण्यात येत आहे.
या वेळी नगरसेवक निलेश बावीस्कर, भाजप युवा नेते समीर कदम, पनवेल महापालिकेच्या डॉ. अक्षदा गोवारी आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते. आरोग्य केंद्रात येणार्या नागरिकांनी येथे होत असलेल्या शेड उभारणीबाबत समाधान व्यक्त केले आहे.