पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीत प्रत्येक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपित लावावा लागणार आहे. मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा आस्थापनेस महापुरूषांची, गड-किल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबत बुधवारी (दि. 2) आदेश काढला आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम 2018नूसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकानांचे नाम फलक मराठी लावण्यात यावे, अशी नागरिकांनी मागणी केली होती. त्यानूसार प्रत्येक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपीत असणे बंधनकारक असण्याचा कार्यालयीन आदेश पनवेल महापालिकेच्या वतीने काढण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या 2018च्या राजपत्रानूसार प्रत्येक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपीत असणे बंधनकारक आहे. आस्थापनेचे मराठीतील नाव प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे. आस्थापना चालक नामफलक मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो; तथापि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये तसेच ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरूषांची, गडकिल्ल्यांची नावे देण्यात येऊ नये, असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.