Breaking News

कर्जतमध्ये मतदारांमध्ये उत्साह, कार्यकर्ते शांत

कर्जत : बातमीदार

मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 29) कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले. सकाळी मतदारांची तुरळक गर्दी होती. दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. किरकोळ वाद वगळता कर्जत विधानसभा मतदार संघातील मतदान शांततेत पार पडले. आजच्या मतदानाचे वैशिष्ट्ये म्हणजे मतदारांसाठी सेल्फी पॉईंट, अंध आणि दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आलेले विद्यार्थी, मतदारांसोबत आलेल्या लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणाघर. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली. वातावरणात असलेला प्रचंड उष्मा लक्षात घेता सायंकाळी चारनंतर शहरी भागात मतदारांनी गर्दी केलेली दिसून आली.

नेरळ येथे टेपआळी भागातील जनार्दन शिंदे या मतदाराचे आज लग्न होते,हा नवरदेव लग्नाला जाण्यास निघाल्यानंतर नेरळ गावातील दगडी शाळेतील मतदान केंद्रात येऊन मतदान करून पुढील प्रवासासाठी निघाला. तर एकसळ येथील दर्शना बोराडे या नव मतदार हिचे आज बदलापूर येथे लग्न होते, मात्र लग्नाला जाण्याआधी तिने एकसळ येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. यावेळी नवरी मुलीसोबत वर्‍हाडी मंडळीनींही मतदानाचा अधिकार बजावला.दिवसभरात कर्जत तालुक्यातील चार ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाला. त्यात नेरळ येथे 70 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर व्हीव्ही पॅट मशीनमध्ये बिघाड झाल्याने ते बदलण्यात आले.तर त्यानंतर 107 क्रमांकाच्या सालवड, 165 कर्जत दहिवली, 271 खोपोली आणि वरई अशा चार मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने त्या बदलण्यात आल्या. त्यातील सालवड येथे तब्बल दीड तास यंत्र बंद असल्याने मतदान प्रक्रिया बंद पडली होती. परिणामी गावातील 50 हुन अधिक मतदार मतदान न करताना परत गेले असल्याची खंत ग्रामस्थ संकेत निकम यांनी व्यक्त केली. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी कर्जत शहरातील अभिनव शाळेतील 171 क्रमांकाच्या केंद्रामध्ये सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. सेल्फी पॉईंटसह या केंद्रावर फुग्यांची अनोखी आरास मतदारांना चांगलीच आकर्षित करत होती.तेथील सर्व अधिकारी आणि कर्मचारी महिला होत्या. बहुतांश मतदान केंद्रामध्ये पाळणाघरेही उभारण्यात आली होती. याकाळात कर्जत विधानसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान झाले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply