Breaking News

माणगाव-ताम्हाणी मार्गावर धोकादायक वळणे

अरुंद रस्त्यामुळे अपघाताला आमंत्रण; घाटातील प्रवास पर्यटकांसाठी ठरते डोकेदुखी

माणगाव : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणार्‍या माणगाव-ताम्हाणी-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटाची संरक्षक भिंती धोकादायक आहेत. हा रस्ताही अरुंद व अवघड वळणाचा असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा येथून येणार्‍या पर्यटक, प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. येथील धोकादायक वळणे, अरुंद रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे. त्यामुळे ताम्हाणी घाटातील प्रवास पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्याकडे राज्य शासनाच्या अखत्यारित येणार्‍या सार्वजनिक बांधकाम व रस्ते विकास मंडळाने याकडे डोळेझाक करीत आहे.

हा मार्ग 1989-90 च्या दरम्यान सुरू झाला. त्यावेळी या मार्गावर कांही ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यात आल्या होत्या काहीं ठिकाणी त्या कमकुवत झाल्या आहेत. ताम्हाणी घाटातील कमकुवत संरक्षक भिंतीमुळे अपघाताला सध्या निमंत्रण मिळत आहे. तर अनेक धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे नसल्यामुळे प्रवाशांना आपला प्रवास करताना असुरक्षित वाटत आहे. या मार्गांनी अनेक पर्यटक रायगड दर्शनासह कोकण दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात. मुळातच हा मार्ग अनेक ठिकाणी अरुंद आहे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून वळणावर समोरून येणारे वाहने दोन्ही वाहनाच्या चालकांना दिसत नाहीत. या संरक्षित भिंतींची डागडुजी किंवा दुरुस्ती झाली नाही. ती प्राधान्याने करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

रायगड हद्दीतील ताम्हाणी घाटातील कोंडेथर गावाजवळ सुमारे 8 कि.मी अंतराचा घाट असून या घाटात गेल्या वर्षभरात 20 उपघात होऊन सहा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 35 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ताम्हिणी घाटातील रस्ता हा पूर्णतः अवघड नागमोडी वळणाचा तसेच चढ व उतारू असल्यामुळे ज्या ठिकाणी अवघड वळणे आहेत त्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधणे आवश्यक आहे, परंतु अनेक ठिकाणी संरक्षक भिंतीचा अभाव असून खोल दर्‍यांमुळे वाहन चालकांना धोका संभवतो, या मार्गावर वाहतुकीमध्ये दिवसेनिदिवस वाढ होत आहे. श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर, माणगावसह दक्षिण रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात  येत असून या ताम्हणी घाटामध्ये अनेक ठिकाणी संरक्षक भिंती नाहीत. सार्वजनिक बांधकाम खात्याने ताम्हाणी घाटातील ज्या ठिकाणी संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे तेथे संरक्षक भिंत उभ्या कराव्यात व कमकुवत झालेले संरक्षण कठडे नव्याने बांधावेत अशी मागणी नागरिक, प्रवासी व पर्यटकातून होत आहे.

उपाययोजना आखण्याची गरज

रायगड जिल्ह्यातील प्रख्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक रायगड किल्ला, महाड येथील चवदार तळे, हरीहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर, दिघी पोर्ट, मुरुड जंजिरा किल्ला, काशीद बीच, समुद्र लगतची किनारपट्टी येथे पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी आवर्जून येतात, मात्र रायगड जिल्ह्यातील घाट हद्दीतील अवघड जीवघेणी वळणे तसेच या मार्गाचे रुंदीकरण करून रस्ता करणे गरजेचे आहे. संरक्षक भिंती व या घाटात दरडी कोसळू नये म्हणून उपाययोजना आखण्याची गरज आहे. राज्य शासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply