कर्जत : बातमीदार
नेरळ टेपआळी येथील जनार्दन शिंदे या तरुणाचा सोमवारी (दि. 29) सायंकाळी शुभ विवाह आहे. तत्पुर्वी अगोदर जनार्दन याने नेरळमधील रायगड जिल्हा प्राथमिक उर्दू शाळेत मतदान करून आपला हक्क बजावला.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्यात मावळ मतदार संघात सोमवारी मतदान घेण्यात आले. यावेळी नेरळमध्ये भर उन्हातदेखील मोठा उत्साह दिसून आला. शहरी व ग्रामीण भागात सकाळच्या वेळी चांगले मतदान झाले. मतदानाच्या दिवशीच नेरळ टेपाआळी येथे एका लग्नाची धावपळ सुरु होती. मात्र, लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी मतदान केंद्रात जावून नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. टेपआळीतील जनार्दन शिंदे यांचा सोमवारी संध्याकाळी विवाह सोहळा होता. त्याआधी त्याने सकाळी नवीन कपडे घालून आणि डोक्यावर फेटा बाशिंग बांधून मतदान केले.
मतदान करुन बाहेर आल्यानंतर ‘होय, मी मतदान केलंय, तुम्ही केलंय का?‘ असा सवाल करत नवरदेवाने फोटोसाठी पोजही दिली. त्यानंतर वर्हाडी मंडळींनीही मतदानाचा हक्क बजावला.