कर्जत : बातमीदार
लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील मतदानाला सोमवारी सकाळी सुरुवात झाल्यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघात दुपारपर्यंत चार ठिकाणी मतदान यंत्रणा बंद पडली. नेरळ येथील मतदान केंद्रात व्हीव्हीपॅट मशीन तर सालवड येथील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदार काही काळ ताटकळत थांबून राहिले होते. खोपोली आणि कर्जत शहरातील एका मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाला होता.
मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत विधानसभा मतदारसंघात सोमवारी मतदानास सुरुवात झाली. नेरळ येथील कन्या शाळेत असलेल्या मतदान केंद्र क्रमांक 70 मध्ये सकाळी सव्वा नऊ वाजता व्हीव्हीपॅट मशीन बंद पडले. त्यानंतर तेथील मतदान केंद्र अध्यक्ष जे. एस. माळी यांनी क्षेत्रीय अधिकारी अक्षय चौधरी आणि उमेदवारांचे मतदान केंद्र प्रतिनिधी दत्तात्रय कासार आणि इम्तिहाज मेमन यांच्यासमोर व्हीव्हीपॅट मशीन बदलले. त्यानंतर बंद पडलेले व्हीव्हीपॅट मशीन या सर्वाचे समक्ष सील करण्यात आले आणि नवीन व्हीव्हीपॅट लावून मतदान सुरू करण्यात आले. या दरम्यान नेरळमधील मतदार 15 मिनिटे थांबून राहिले होते. सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नसरापूर (ता. कर्जत) ग्रामपंचायत हद्दीतील सालवड मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन बंद पडले. तोपर्यंत त्या एव्हीएम मशीनमध्ये 141 मतदारांचे मतदान नोंदविले गेले होते. सदरचे मशीन बदलून घेण्याच्या कामाला तासाभराचा वेळ लागल्याने 50 हुन अधिक मतदार थांबून राहिले होते तर मतदान यंत्र पुन्हा सुरू होण्यास वेळ लागत असल्याने काही मतदार घरी निघून गेले. तहसीलदार अविनाश कोष्टी आणि क्षेत्रीय अधिकारी महेश कुमार यांच्या उपस्थितीत नवीन ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन बसविण्यात आल्यानंतर तासभर खोळंबून राहिलेली मतदान प्रक्रिया पुन्हा पूर्ववत झाली. कर्जत शहर हद्दीमधील दहिवली केंद्रातील ईव्हीएम मशीन बंद पडले, तेथे क्षेत्रीय अधिकारी आर. डी. चव्हाण यांनी मतदान यंत्र बदलून दिले. तर खोपोलीतील 271 क्रमांकाच्या मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला असल्याची माहिती कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी यांनी दिली आहे. खोपोली येथे क्षेत्रीय अधिकारी आर. के. चव्हाण यांनी सदरच्या मतदान केंद्रात जाऊन मतदान यंत्र बदलून दिले आणि त्यानंतर मतदान पूर्ववत सुरू झाले.