पनवेल मनपा क्षेत्र स्वच्छ, सुंदर राखण्यासाठी पाऊल
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेला महासभेने ‘क्लीनअप मार्शल’ची नेमणूक करण्यास मंजुरी दिल्यावर बेशिस्त नागरिकांवर आता या क्लीनअप मार्शलची नजर असणार आहे.
पनवेलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामध्ये परिसर स्वच्छतेबरोबरच मास्कचा वापर न करणार्यांविरोधात क्लीनअप मार्शलद्वारे पोलिसांसह रेल्वे स्टेशन व एसटी स्टँड परिसरात कारवाई केली जाते.
महापालिकेने बेशिस्त नागरिकांकडून अडीच लाख रुपये दंड वसूल केला आहे. त्याचबरोबर स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करणार्यांवर क्लीनअप मार्शलमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून सुरू असलेल्या कारवाईचे शिस्तप्रिय नागरिकांनी स्वागत केले आहे.
पनवेल स्वच्छ आणि सुंदर ठेवताना रस्त्यांवर कुठेही थुंकणार्या ’बहाद्दरां’वर क्लीनअप मार्शल कडून कडक कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेकडून आता प्रत्येक प्रभागात कंत्राटी पद्धतीने 4 ते 6 क्लीनअप मार्शल नेमले आहेत. या पद्धतीने सध्या 15 ते 30 क्लीनअप मार्शल शहर स्वच्छतेची जबाबदारी सांभाळत आहेत.
शहर स्वच्छतेसाठी पालिकेने नेमलेल्या अधिकृत क्लीन-अप मार्शल्सना पालिकेने विशिष्ट गणवेश दिला असून, त्यांच्याजवळ दंडाची रक्कम असणारे कार्ड देण्यात आले आहे. कारवाईचे स्वरुप अधिक तीव्र करण्यासाठी पालिकेकडून प्रत्येक विभागांत अतिरिक्त क्लीनअप मार्शल नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे, रस्त्यावर थुंकणार्या, कचरा फेकणार्यांवर दंडात्मक कारवाई अजून मोठ्या प्रमाणांत तीव्र केली जाणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रात, रस्त्यांवर, लोकल-बस प्रवासादरम्यान कुठेही बिनदिक्कत थुंकणार्यांची संख्या मोठी आहे. पालिकेच्या नियमानुसार रस्त्यावर घाण केल्यास सामान्य व्यक्तीवर कारवाई केली जाते. रस्त्यावर थुंकणार्या रिक्षा चालकांचे प्रमाण मोठे आहे, पण त्यांच्यावर कारवाई होताना मात्र दिसत नसल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली.
स्वच्छ सर्वेक्षणात सन 2020-21मध्ये पनवेल महानगरपालिकेने उत्तम कामगिरी केली होती. यापुढेही महापालिकेचे मानांकन उंचावले जावे यासाठी महापालिकेने ‘क्लीन अप’ मार्शल योजना सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, मलमूत्र विसर्जित करणे, प्लॅस्टिक बंदी आदींवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिका उपविधी तयार करून ‘क्लीनअप’ मार्शल तैनात केले आहेत. प्लॅस्टिक बंदीवरतीही महापालिकेच्यावतीने कठोर कारवाईस सुरूवात करण्यात आली आहे. मार्केट, रेल्वे परिसर, वर्दळीचे रस्ते, खाडी किनारे, महत्त्वाची व्यावसायिक संकुले तथा औद्योगिक संकुले, फेरीवाले विभाग आदी प्रभागातील वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणीच क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे.
आत्तापर्यंत सोशल डिस्टन्स 297, चेहर्यावर मास्क न लावणे 401, उघड्यावर शौचास बसने 40, बेकायदेशीर प्लास्टिक पिशवीचा वापर एक, रस्त्यावर थुंकने सात, रस्त्यावर कचरा फेकण तीन अशा एकूण 574 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
रस्ते अथवा मार्गावर घाण करणे 150 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे 100 रुपये, उघड्यावर लघवी/ लघुशंका करणे 100 रुपये, उघड्यावर शौच करणे 500 रुपये, प्लास्टीक बंदीचा पहिला गुन्हा पाच हजार रुपये, प्लास्टीक बंदीचा दुसरा गुन्हा दहा हजार रुपये, प्लास्टीक बंदीचा तिसरा गुन्हा 25 हजार रुपये, विलगीकरण न केलेला व व वेगळ्या डब्यांमध्ये साठवण न केलेला कचरा सोपविल्याबद्दल पहिल्या, दुसर्या, तिसर्या प्रसंगी अनुक्रमे 50, 100, 150 रूपये दंड, कचरा जाळण्याबाबत 300 रूपये दंड, सार्वजनिक ठिकाणी विनामास्क 500 रूपये दंड आकारण्यात आले आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रात काही बेशिस्त नागरिकांमुळे अस्वच्छतेत भर घातली जात असते. अशा नागरिकांना शिस्त लागावी याकरिता पालिका क्षेत्रात स्वच्छता मार्शलची नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांचेदेखील आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तितकेच सहकार्य महत्त्वाचे आहे. -गणेश देशमुख, आयुक्त महापालिका