Breaking News

हैदराबादचा पंजाबवर दमदार विजय

हैदराबाद : वृत्तसंस्था

हैदराबादच्या संघाने पंजाबवर 45 धावांनी विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नरच्या तुफानी 81 धावांच्या खेळीच्या बळावर हैदराबादने पंजाबपुढे 213 धावांचे विशाल आव्हान ठेवले होते, पण राहुलच्या (79) अर्धशतकाच्या जोरावर पंजाबचा संघ 8 बाद 167 धावांपर्यंतच मजल मारू शकला. रशीद आणि खलीलने प्रत्येकी तीन बळी टिपले. पंजाबचा हा गेल्या सहा सामन्यांतील पाचवा पराभव ठरला.

213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेल फटकेबाजीच्या प्रयत्नात झेलबाद झाला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. त्याने 3 चेंडूंत एका चौकारासह अवघ्या 4 धावा केल्या. त्यानंतर भागीदारी होत असतानाच मयंक अग्रवाल बाद झाला. त्याने 18 चेंडूंत 27 धावांचे योगदान दिले. फटकेबाजी करणारा धोकादायक फलंदाज निकोलस पूरन 10 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 21 धावा करून झेलबाद झाला. डेव्हिड मिलरने फटकेबाजीचा प्रयत्न केला, पण रशीद खानने आधी मिलर आणि नंतर पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन असे 2 चेंडूंत 2 बळी टिपले. मिलरने 11 चेंडूत 11 धावा केल्या, तर अश्विन पहिल्याच चेंडूवर माघारी परतला.

एकीकडे गडी बाद होत असताना लोकेश राहुलने मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर सलग 2 षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केले. राहुल 79 धावांवर बाद झाला. इतर कोणीही जबाबदारीने फलंदाजी केली नाही. त्यामुळे पंजाबला पराभवाला सामोरे जावे लागले.

त्याआधी आपला अखेरचा सामना खेळणार्‍या वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी वृद्धीमान साहासोबत 78 धावांची भागीदारी केली. साहा (28) माघारी परतल्यानंतर वॉर्नरने मनीष पांडेच्या साथीने डावाला पुन्हा एकदा आकार दिला. दोन्ही खेळाडूंनी पंजाबची गोलंदाजी व्यवस्थित खेळून काढत धावफलक हलता ठेवला. यादरम्यान वॉर्नरने आपले अर्धशतकही पूर्ण केले. त्याने 56 चेंडूंत 81 धावांची खेळी केली. या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. मधल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करीत संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply