मुंबई : प्रतिनिधी
आघाडीच्या काळात मुंबईची अवस्था कशी होती ते आठवा? या आघाडीने तर आदर्श घोटाळा करून लष्करातील जवानांनाही सोडले नाही. दुसरीकडे पाच वर्षांत महाराष्ट्र सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. 18) येथे व्यक्त केला.
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विरोधकांना फैलावर घेतले. मुंबईत 16 वर्षांत फक्त 11 किमीची मेट्रो उभारली. ही गती तर कासवापेक्षाही कमी आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आपल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे माझे लहान भाऊ आहेत, असा उल्लेख पुन्हा एकदा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांचा आढावा घेत विजयाचे आवाहन केले, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, काँग्रेस पक्ष आता महाराष्ट्रात उरलाच नाही. राष्ट्रवादीही संपत आली आहे. महाराष्ट्रात भगवे वातावरण दिसते.
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार; सर्व्हेचा अंदाज
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर 24 ऑक्टोबरला अंतिम निकाल स्पष्ट होईल. त्यापूर्वी एबीपी माझा आणि सी व्होटर यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील जनमताचा कल या वेळीदेखील भाजप-शिवसेना महायुतीकडे असून, विद्यमान सरकारच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महायुतीला 288 पैकी 194, तर महाआघाडीला अवघ्या 86 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप सर्वाधिक 134 जागा जिंकून मोठा पक्ष असेल. त्याखालोखाल शिवसेना 60, तर काँग्रेस 44 आणि राष्ट्रवादी 42 असे आकडे समोर आले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांनाच सर्वाधिक मतदारांनी कौल दिला आहे.