मोहोपाडा : रामप्रहर वृत्त
उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्याने मुकी जनावरेही त्रस्त झाली आहेत. उन्हाच्या त्रासामुळे गारवा मिळावा यासाठी गुरे पाण्याचा आसरा घेताना दिसत आहेत. मुके प्राणी पाण्यात राहून आपले शरीर थंड करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. पाताळगंगेच्या पात्रात गाई-म्हशी ठाण मांडत आहेत. उन्हाचा चढता पारा पाळीव जनावरांनाही असह्य झाला असून, अंगाची झालेली लाही लाही शिनवण्यासाठी ही जनावरे पाण्याच्या डबक्याचा आधार घेत आहेत. उन्हाचा पारा अधिकच वाढल्याने मुक्या प्राण्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, परंतु माणसाला त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. माणूस लग्नसराईत, तसेच वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतला आहे. त्यामुळे गुरांची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने या मुक्या प्राण्यांनी आपला मोर्चा गारवा मिळविण्यासाठी पाण्याच्या ठिकाणी वळवला असल्याचे चित्र सध्या रसायनी परिसरात दिसून येत आहे.