Breaking News

प्रसिद्धीसाठी स्वातंत्र्यवीरांवर टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना फटकारले

मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रसारमाध्यमांकडून जास्त प्रसिद्धी मिळत नव्हती. ती मिळावी म्हणून ते वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फटकारले आहे. राहुल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यासंदर्भात ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही राहुल गांधींच्या वक्तव्यावर असहमती दर्शवली आहे, तर मनसेनेदेखील राहुल यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर लोकांमध्ये 100 टक्के नाराजी व राग आहे, कारण ज्यांनी काळे पाणी आणि तुरूंगवासाची शिक्षा भोगली त्यांच्याबद्दल ज्यांनी पायरीदेखील पाहिली नाही अशा लोकांनी बोलावे हे अत्यंत दुर्दैवी आहे.
अशा लोकांवर कारवाई करून काही फायदा नसतो. अनेक केसेस यापूर्वीही ते भोगत आहेत. ते तसेही बेलवरच आहेत. अनेकदा कोर्टात हजर राहत नाहीत. म्हणून त्यांचे वॉरंट निघतात. एवढेच आहे की, ते जे खोटे बोलत आहेत, त्याचे उत्तर मात्र आम्ही निश्चितपणे देऊ, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

…अन्यथा कारवाई करू!
एक प्रकारे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे सुरू आहे. मी एवढेच सांगतो की, ते हे जे काही करीत आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहून केले तर ठीक आहे, पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जर त्यांनी काही केले तर त्यावर कारवाई आम्हाला करावी लागेल. आम्ही त्यांच्या यात्रेस सुरक्षा दिली आहे. सुरक्षितपणे आम्ही त्यांची यात्रा बाहेर काढू, पण महाराष्ट्राचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा इशारा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिला.

राहुल गांधींना झप्पी मारणारे आदित्य ठाकरे गप्प का? -आशिष शेलार
मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी जाणूनबुजून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करीत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान काँग्रेस करीत आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांना जोडे मारले होते, पण ‘भारत जोडो यात्रेत’ राहुल गांधींना झप्पी मारणारे आदित्य ठाकरे गप्प का?, असा सवाल भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. ते पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी जाणूनबुजून अशी वक्तव्य करीत आहेत, कारण त्यांना महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान करायचा आहे. त्यांना जुन्या इतिहासावर मीठ चोळायचे आहे. राहुल गांधींना इतिहासाची माहिती असेल तर एका मंचावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीवर चर्चा करू. भाजपचे नेते राहुल गांधींना उघड पाडल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान या वेळी आमदार आशिष शेलार यांनी दिले.
शिवसेना सत्तेसाठी माती खात असून केवळ बोटचेपी भूमिका घेत इशारे देण्याचे काम करीत आहे. देशभक्त नागरिक, मराठी माणूस उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना माफ करणार नाही. तुमचे राजकारण आणि महाविकास आघाडी तुम्हाला लखलाभ राहो, असेही शेलार यांनी म्हटले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply