पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस चौकी उभारण्याची मागणी; सभापती अॅड. वृषाली वाघमारे यांची पोलिसांसोबत चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात प्रभाग क्रमांक 17 मधील नवीन पनवेल सेक्टर 17, 18, 15 येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवा व यासाठी पोलीस चौकी उभारा, अशी मागणी प्रभास समिती ‘ड’च्या सभापती अॅड. वृषाली वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक संजय कदम यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले.
ट्रॅफिकच्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी प्रभाग समिती कार्यालय येथे सभापती अॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेसाठी उपस्थित माजी बांधकाम सभापती व महाराष्ट्र ओबीसी सेलचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका सुशीला घरत, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, भाजप कार्यकर्ते अॅड. जितेंद्र वाघमारे, पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी अमर पाटील, ट्रॅफिक पोलीस अधिकारी श्री. कदम उपस्थित होते.
या वेळी पनवेल स्टेशन व नवीन पनवेल येथील पीएल-5 येथे होणार्या ट्रॅफिकच्या समस्यांबाबत मार्ग काढण्यास संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. या ठिकाणी कायमस्वरुपी ट्रॅफिक पोलीस व कायमस्वरूपी पोलीस चौकीची निर्माण करण्यात यावी या आशयाचे पत्र सभापती अॅड. वृषाली वाघमारे व अॅड. मनोज भुजबळ यांच्यामार्फत करण्यात आली. यासोबतच त्यांनी विविध ठिकाणची वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासंदर्भात काही सूचना मांडल्या. यावर वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक संजय कदम यांनी लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांची व नागरिकांची ये-जा होत असते. रेल्वे स्टेशन समोरील बिकानेर कॉर्नर येथे अनधिकृतरित्या वाहने पार्क करत असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतुक कोंडी होत आहे तसेच तेथून अत्यावश्यक सेवेतील वाहने व अॅम्ब्युलन्ससाठी येण्या-जाण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णास हॉस्पीटलमध्ये वेळेवर पोहचविण्यास विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीवर आळा बसविण्याकरीता नवीन पनवेल रेल्वे स्टेशनसमोर नवीन पोलीस चौकी उभारण्यात यावी, असे अॅड. वाघमारे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.