राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खटके उडत आहेत. वाद झाले की पुन्हा जुळवून घेतले जाते. आता पुन्हा एकदा वाद सुरू झाले आहेत. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात पालकमंत्री हस्तक्षेप करत असल्याचा थेट आरोप करून पालकमंत्री आदिती तटकरे यांना हटविण्याची मागणी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार आणि जिल्हा प्रमुखांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पालकमंत्र्यांविरोध शिवसेनेच्या आमदारांनी अनेकदा आवाज उठवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणार्या कुरघोड्यांबाबत आवाज उठवला. परंतु शिवसेनानेतृत्व त्याकडे दुर्लक्ष करतय. शिवसेने रायगड जिल्ह्यातील आपली ताकद दाखवली पाहिजे. ती संधी येत्या जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या निवडणूकांध्ये शिवसेनेला मिळणार आहे.
महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री नको शिवसेनेचा पालकमंत्री हवा अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली होती. अखेर दोन्ही पक्षात सुसंवाद वाढावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही पक्षाच्या आमदार आणि पदाधिकार्यांची मुंबईत बैठक घेतली होती. यानंतर शिवसेनेच्या आमदारांना विश्वासात घेऊन काम करा, असा सल्ला पालकमंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आला होता. शिवसेनेच्या आमदारांनाही पालकमंत्री तटकरे यांच्याशी जुळवून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानंतरही दोन्ही पक्षात खटके उडतच राहिले.
रायगड जिल्हा परिषदेतही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता यावी, यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी आग्रही होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेत शिवसेनेशी जुळवून घेण्यास नकार दिला. शेतकरी कामगार पक्षाशी निवडणूकपुर्व आघाडी असल्याचे कारण त्यावेळी देण्यात आले. त्यामुळे शिवसेनेला विरोधी पक्षात बसावे लागले. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून दोन्ही पक्षात खटके उडाले. शिवसेना आमदारांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना नेते माजी केंद्रीयमंत्री अनंत गिते यांनी एका मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर थेट शाब्दीक चढवला होता. यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी अनंत गीते नैराश्यात असून त्यांच्या वक्तव्यांना फारसे महत्त्व द्यायला नको, असे म्हटले होते. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेशी जुळवून न घेता पुहा एकदा शेकापशी आघाडी केली. पाली, तळा आणि म्हसळा नगरपंचायती जिंकल्या. शिवसेनेचा पराभवकरून तळा नगरपंचायत ताब्यात घेतली. माणगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केला. त्यासाठी शिवसेने काँग्रेस आणि भाजपची मदत घेतली. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागला. खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. या पराभवाचा वचपा घेणार असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे दोन्ही पक्षातील संबध अधिकच ताणले गेले.
शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात मंजूर झालेल्या योजनांचे श्रेय पालकमंत्री तटकरे यांनी घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संतापलेल्या शिवसेना आमदारांनी पालकमंत्र्यांविरोधात थेट आवाज उठवला. पालकमंत्री शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे त्यांना बदला. जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री द्या, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
रायगडचे पालकमंत्री बदला अशी मागणी शिवसेनेच्या आमादारांनी अनेकवेळा केली. राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या मतदारसंघात कुरघोड्या करते. त्यांना सामजवा, अशी विनंती केली. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. त्याची दखल शिवसेनेच्या नेतृत्वाने घ्यायला हवी होती. तसे न करता त्याकडे दर्लक्ष केले. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना गप्प केले. शिवसेना नेतृत्वाच्या बोटचेपे धोरणामुळे रायगड जिल्ह्यात ताकद असूनही शिवसेनेला गप्प बसावे लागत आहे. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री बदला, असे ओरडून पालकंमत्री बदलला जाणार नाही. हे शिवसेनेच्या आमदारांनादेखील माहित आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघ शिवसेनकडून गेला आहे. रायगड जिल्ह्यातील हक्काचा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ गेला. त्याची दखल खरतर शिवसेनापक्ष नेतृत्वाने घ्यायला हवी होती. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांच्या मागणीकडे पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केले म्हणून ही पाळी शिवसेनवर आली. हे असेच सुरू राहिले तर जी अवस्था रायगड जिल्ह्यात काँगेस पक्षाची झाली तीच शिवसेनेची होईल.
पालकमंत्री बदला ही मागणी आता नेहमीचीच झाली आहे. पालकमंत्री बदला अशी मागणी केल्यानंतर जूळवून घेण्याचा सल्ला दिला जातो. शिवसेनेचे आमदार गप्प बसतात. त्यामुळे आता पालकमंत्री बदलण्याची मागणी करत बसण्यापेक्षा आगामी जिल्हा परिषद, पंचयात समित्या, नगर परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढवून शिवसेनेने राष्ट्रवादीला आपली ताकद दाखवावी, असा सूर शिवसैनिक आळवू लागले आहेत.
-प्रकाश सोनवडेकर, खबरबात