भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका
कोल्हापूर ः प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 22) कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना केली.
दिशा सालियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याचा आरोप एका पत्रकाराने निदर्शनाला आणला असता ते म्हणाले की, याबाबतीत काहीही राजकारण होत नाही. 7 मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील. दूध का दूध-पानी का पानी होईल. यात कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. उसाचे एफआरपीचे पैसे दोन तुकड्यात देण्याचा या सरकारचा निर्णय ऊस उत्पादक शेतकर्यांचे प्रचंड नुकसान करणारा आहे. यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील असा धोका आहे. भारतीय जनता पक्ष या निर्णयाविरोधात टोकाचा संघर्ष करेल.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2014 साली भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केले. आम्ही हे सरकार आमच्या बळावर पाच वर्षे चालविले असते, पण शिवसेनेला सत्तेबाहेर राहणे अशक्य झाले. काहीही करून सत्तेत घ्यावे यासाठी ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करीत होते हे आदित्य ठाकरे यांनी विसरू नये.
मविआ सरकारने राजकारणासाठी सत्तेचा व पोलिसांचा दुरुपयोग चालविला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात 7 मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल व हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो.
-चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप