अलिबाग : जिमाका
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी (दि.1) सकाळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अलिबागमधील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदींची उपस्थिती होती. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी जागतिक कामगार दिनाच्या समस्त कामगार वर्गाला शुभेच्छा दिल्या.
रायगड किल्ला हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. या जिल्ह्याला निसर्गाने मुक्तहस्ताने वरदान दिले आहे असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, येथील विस्तीर्ण समुद्र किनारे, बहरलेली जंगले, नयनरम्य धबधबे, थंड हवेची ठिकाणे, प्राचीन धार्मिक स्थळे यामुळे ही भूमी खर्या अर्थाने कोकणचीच राजधानी म्हटले तर वावगे ठरणार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा चवदार तळ्याचा ऐतिहासिक लढा म्हणजे या भूमीतून झालेली सामाजिक न्यायाची अभूतपूर्व क्रांती होती. कान्होजी आंग्रे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, महान विचारवंत विनोबा भावे, सी. डी. देशमुख यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पोलीस दलाने बहारदार संचलनही केले.
ध्वजारोहणानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, कर्मचारी यांना भेटले आणि त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
- आगरी, कोळी, आदिवासी समाज यांनी येथील सांस्कृतिक परंपरा आणि वैशिष्ट्य टिकवून ठेवले आहे. विविध जाती-धर्माच्या लोकांचा सलोखा आणि एकूणच स्नेहाचे आणि शांततामय वातावरण असलेला हा रायगड जिल्हा म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे.
-रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, रायगड