Breaking News

तुम्ही जामिनावर बाहेर आहात हे विसरू नका

मुख्यमंत्र्यांचा भुजबळांवर निशाणा

नांदेड ः प्रतिनिधी

विरोधकांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून त्यांना सभेत नकलाकार आणावे लागतात आणि ती लोक नरेंद्र मोदीजींची स्टाईल मारत फिरतात, पण मी या नकलाकारांना इतकंच सांगतो की तुम्ही सूर्याकडे पाहून थुंकले की थुंकी आपल्याच चेहर्‍यावर पडते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला आहे. छगन भुजबळ तुम्ही स्वातंत्र्यलढ्यासाठी नव्हे, तर भ्रष्टाचार केला म्हणून तुरुंगात गेला. अजून तुमची सुटका झालेली नाही. तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात हे विसरू नका. किती बोलावं आणि काय बोलावं याचा जरा विचार करा, असेही त्यांनी भुजबळांना सुनावले आहे. नांदेड येथे शुक्रवारी भाजपच्या बुथ प्रमुखांचा मेळावा झाला. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुथप्रमुखांना संबोधित केले. देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबाबत सारा देश शोक व्यक्त करत असताना विरोधकांनी आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले खरे; परंतु विरोधक याबाबत राजकारण करीत आहेत. खरे देशभक्त असाल तर सैन्याच्या पाठीशी उभे राहा, असे त्यांनी सांगितले.येणार्‍या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी ‘महाठगबंधन’ गठीत केले असून भारतात निवडणुकीसाठी दोन गट पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी देशसेवा करीत आहेत, तर दुसरीकडे सर्व विरोधक एकत्र येत ‘महाठगबंधना’च्या नावाखाली आपल्या परिवाराचा व खुर्चीचा विचार करीत असल्याची टीका त्यांनी केली. भाजपला नव्हे तर देशाला जिंकून देण्यासाठी काम करा, असेही त्यांनी सांगितले. छगन भुजबळांवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, तुम्ही स्वातंत्र्यलढ्यासाठी किंवा गरिबांसाठी तुरुंगात गेला नाही. भ्रष्टाचार केला आणि राज्याच्या तिजोरीतील पैसा स्वतःच्या तिजोरीत भरला म्हणून तुम्ही तुरुंगात गेला. तीन वर्षे तुम्ही तुरुंगात होता आणि अजूनही तुमची सुटका झालेली नाही. तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात, हे विसरू नका, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सुनावले.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply