गव्हाण ः रामप्रहर वृत्त
देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध उपक्रमांची रेलचेल चालू आहे. देशभक्तीपर उपक्रमांनी गव्हाण पंचक्रोशी देशभक्तीने ओथंबल्याचे चित्र दिसत आहे.
विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात येत आहेत. गव्हाण कोपर गावातून विद्यार्थ्यांनी गुरुवारी (दि. 4) जनजागृती फेरी काढून हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा विजय असो, भारत माता की जय अशा विविध घोषणांनी ढोल-ताशांच्या गजरात परिसर दणाणून सोडला.
गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजयशेठ घरत व रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांच्या हस्ते तिरंगा ध्वज उंचावून जनजागृती फेरीचे प्रस्थान झाले. जनजागृती फेरीची सांगता पुन्हा विद्यालयाच्या मैदानावर झाली. या वेळी प्राचार्या साधना डोईफोडे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी, रवींद्र भोईर, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर, जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे, प्रसन्न ठाकूर, शिक्षक पालक संघाचे सचिव देवेंद्र म्हात्रे अन्य शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या पालकांसाठीही सोमवारी (दि. 8) वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर यांनी दिली.