कर्जत : बातमीदार
नेरळ जुम्मापट्टी येथील प्राथमिक शाळेतील वर्गात घुसून पिसाळलेल्या माकडाने गुरुवारी (दि. 24) पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनीला चावा घेतला होता. त्या जखमी विद्यार्थिनीला उल्हासनगर येथे उपचार करून घरी आणण्यात आले आहे. दरम्यान, त्या ठिकाणी येणार्या माकडांना पकडण्यासाठी वन विभागाने या शाळेच्या परिसरात पिंजरे लावले आहेत.
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील जुम्मापट्टी या आदिवासी लोकवस्तीच्या गावातील प्राथमिक शाळेच्या वर्गात घुसून पिसाळलेल्या माकडाने गुरुवारी प्रज्ञा शिंगाडे या सहा वर्षाच्या मुलीला चावा घेतला होता. तिला उपचारासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तेथे आवशयक असलेले इंजेक्शन उपलब्ध नव्हते. त्यामुळे प्रज्ञाला शाळेच्या मुख्याध्यापिका गीता पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र पारधी व पालकांनी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारानंतर प्रज्ञाला घरी सोडण्यात आले.
दरम्यान, स्थानिकांच्या मागणीनंतर वन विभागाने पिसाळलेल्या माकडांना पकडण्यासाठी जुम्मापट्टी शाळेच्या परिसरात पिंजरा बसविला. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्र पारधी, शाळेच्या मुख्याध्यापिका गीता पाटील, ग्रामस्थ सुनील पारधी, तुळशीराम निरगुडे, तसेच शिक्षिका सुनीता खैरे, माधुरी केवारी, छाया चव्हाण, वैशाली ढोले आदींसह पालक उपस्थित होते.
पिसाळलेल्या माकडांना पकडण्यासाठी जुम्मापट्टी प्राथमिक शाळेच्या परिसरात पिंजरा लावण्यात आला असून, मुंबई येथून माकडे पकडणार्यांच्या पथकालाही पाचारण केले आहे. हे पथक आल्यानंतर पिसाळलेल्या माकडांना पकडण्याची मोहीम सुुरू करण्यात येईल. -एस. एच. म्हात्रे, वनपाल, नेरळ