Breaking News

अहंकार्‍यांना महाराष्ट्र झुकवणारच!

देवेंद्र फडणवीस यांचा मविआ सरकारला इशारा

मुंबई : प्रतिनिधी
मविआचे नेते अलीकडे कोणतीही कारवाई झाली तरी महाराष्ट्र झुकणार नाही, असा डायलॉग मारतात, पण मविआचे नेते म्हणजे महाराष्ट्र नव्हे. राज्यातील 12 कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. तुमच्यासारख्या अहंकार्‍यांना हा महाराष्ट्र झुकवून दाखवेल, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मविआ सरकारला इशारा दिला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावरही भाजप बहिष्कार टाकत असल्याचे फडणवीसांनी जाहीर केले. ते बुधवारी (दि. 2) मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत ज्या गोष्टी घडल्या नाहीत, त्या या सरकारच्या काळात घडत आहेत. मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार असलेल्या दाऊदशी आर्थिक व्यवहाराचा आरोप असलेले मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली आहे. त्यानंतरही संपूर्ण राज्य सरकार नवाब मलिक यांच्या पाठिशी उभे आहे. ज्यांनी दाऊदला सहकार्य केलं, मुंबईच्या खुन्यांशी व्यवहार केले त्यांना वाचवण्यासाठी अख्खं सरकार उभं आहे. पोलीस कोठडीत गेल्यानंतरही एखादी व्यक्ती मंत्रिपदी कायम आहे. हा राज्यघटनेचा अवमान आहे. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या कार्यकाळात मुंबईच्या खुन्यांसोबत व्यवहार करणार्‍यांना पाठिशी घातले जात आहे, हे दुर्दैव आहे. मुंबईच्या खुन्यांशी व्यवहार कुठल्याही परिस्थितीत मान्य केला जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही येत्या अधिवेशनात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार आहोत. त्यासाठी आम्ही सभागृहात संघर्ष करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा, मराठा-ओबीसी आरक्षण, शेतपंपांची वीज तोडणे आणि भ्रष्टाचाराचे आरोप अशा विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला लक्ष्य केले. राज्य सरकारने ग्रामीण भागात शेतकर्‍यांच्या वीजपंपांची कनेक्शन कापण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला सरकारमध्ये कुठलीही किंमत राहिलेली नाही, हे स्पष्ट झाले आहे. गेल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला अजित पवार यांनी शेतकर्‍यांची वीज कापणार नाही, असे म्हटले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी घुमजाव करत वीज कनेक्शन कापण्याची कारवाई सुरु असल्याचे सांगितले. सध्या तर शेतकर्‍यांची वीज कनेक्शन कापण्याची स्पर्धाच सुरू आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांची अहंकारी वक्तव्ये पाहता राज्यात लोकशाही आहे की हुकूमशाही, असा प्रश्न पडतो, पण भाजप शेतकर्‍यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मराठा-ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांची टीका
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती घराण्यातील व्यक्तीला उपोषणाला बसावे लागते, ही असंवेदनशीलता फक्त याच सरकारच्या काळात दिसली. राज्य सरकारने उपोषण मागे घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांना आश्वासने दिली आहेत. मात्र, ही आश्वासने पूर्ण होतील की नाही, याबाबत साशंकताच आहे. ओबीसी समाजासाठी सुरू करण्यात आलेल्या महाज्योती संस्थेकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे दिले जात नाहीत. महाज्योती बंद पाडण्याचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. ओबीसी समाजावर महाविकासआघाडी सरकारचा इतका राग का, असा सवाल या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply