पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन संचालित श्री. अण्णासाहेब सहस्त्रबुद्घे आदिवासी आश्रमशाळा, वाकडी शांतिवन येथील उपक्रमशिल शिक्षिका विजयश्री राजेंद्र पाटील यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुक्रवारी (दि. 31 मे) औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्यात शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. विजयश्री पाटील यांची आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. त्यांचा ‘चैतन्याचा प्रकाश’ हा दिनविशेषपर चरित्रसंग्रह प्रकाशित झाला आहे. ‘पनवेल तालुक्यातील ठाकूर या आदिवासी जमातींच्या समस्यांचा अभ्यास’ हा प्रबंध सादर करून पुणे विद्यापीठाची एम.फील ही पदवीदेखील संपादन केली आहे. त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षिका या पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.