पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांचे गौरवोद्गार
पनवेल ः वार्ताहर
1993 सालच्या जातीय दंगली असो किंवा दोन वर्षांपासून सुरू असलेला कोरोना काळ असो, या काळात माणसांनी माणसांशी कसे जगावे याची शिकवण सगळ्यांना मिळाली. सर्वांनी आपली जात, धर्म, पंथ विसरुन एकमेकांना मदतीचा हात दिला. कोणत्याही कठीण परिस्थितीत पनवेल व नवी मुंबईमध्ये सामाजिक सलोखा आजही कायम ठेवला जातो, हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी केले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्यावतीने ’आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाअंतर्गत ’सांप्रदायिक सलोखा चर्चासत्र’ गुरुवारी (दि. 10) पनवेलच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते बाबा आलम, मौलाना मुफ्ती मामुन रशीद, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी गोसावी, मानसी पाटील, फादर पॉल आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्राथमिक स्वरुपात कोविड काळात समाजासाठी अहोरात्र झटणार्या व्यक्तींचा प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने व त्यांच्या सहकार्यांनी केल्याबद्दल विशेष कौतुक यावेळी उपस्थित अधिकार्यांनी केले. या वेळी पनवेल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुधीर सुर्वे यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.
कोविड काळात नवी मुंबईमध्ये झालेले काम स्तुत्य आहे. भविष्यातही नवी मुंबई राज्यात कायम अग्रेसर राहिल. महिलांच्या विरोधातील अत्याचाराचे जे गुन्हे आहेत त्यांचे 100 टक्के डिटेक्शन केले आहे. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांबाबतीत नवी मुंबई पोलीस सतर्क आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात महिलांविरोधतील कोणतेही गुन्हे घडलेले नाही. आणि गुन्हांमध्ये फारशी वाढ नाही, असेही सुरेश मेंगडे म्हणाले.