मुंबई ः प्रतिनिधी
उत्तर प्रदेशसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. या विजयाने हुरळून न जाता मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 11) केले. ते मुंबईत आयोजित आनंदोत्सवात बोलत होते. गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रभारी असलेेले देवेंद्र फडणवीस यांचा गोव्यातील यशाबद्दल भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, आमदार आशीष शेलार आदी उपस्थित होते. देेवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाच्या विकासाला वेग देण्यासाठी आणि गोरगरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना अमलात आणल्या आहेत. या योजनांमुळे पंतप्रधान मोदींबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. ’मोदी है तो मुमकीन है’ हा जनतेला वाटणारा विश्वास निवडणुकीच्या निकालातून व्यक्त झाला आहे. गोवा निवडणूक लढविण्यास गेलेल्या महाराष्ट्रातील काही पक्षांचा पुरता धुव्वा उडाला. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांची लढाई ’नोटा’शी आहे हे माझे भाकीत गोव्यातील मतदारांनी खरे ठरवले. गोव्यातील विजयात महाराष्ट्रातून गेलेल्या खासदार, आमदार या लोकप्रतिनिधींचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचीही वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. या विजयानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवून मुंबईकरांची भ्रष्टाचारापासून मुक्तता करण्यासाठी आणि राज्यात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. पाच राज्यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल चार राज्यांत एकहाती विजय मिळविला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुयोग्य नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला असून सर्वत्र जल्लोष केला जात असल्याचे दिसून येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी गोवा विधानसभा निवडणुकीचे योग्य नियोजन करून पक्षाला विजय मिळवून दिला. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांच्या संघटन कौशल्याचा प्रत्यय पुन्हा आला आहे.
-चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; विरोधकांची जोरदार टीका
मुंबई ः महाविकास आघाडी सरकारने शुक्रवारी (दि. 11) येत्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत, ज्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर अर्थसंकल्पाची आपल्या खास शैलीत चिरफाड करीत सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खरे म्हणजे कळसूत्री सरकारने विकासाचे पंचसूत्री मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे, या पंचसूत्रीने काही होणार नाही. कारण या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलिन केलेले आहे आणि दोन वर्षांत महाराष्ट्रातील गोरगरीब, दीनदलित, आदिवासी, शेतमजूर, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, बारा बलुतेदार सर्वांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केलेले आहे. आताचा जो अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे तो ही कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊ शकत नाही. कोणताही दिशा या बजेटला नाही. मागील बजेटच्या घोषणा पुन्हा या बजेटमध्ये करायच्या, चालू कामांच्याच घोषणा बजेटमध्ये करायच्या, आमच्या सरकारच्या काळात सुरू असलेल्या घोषणा पुन्हा या बजेटमध्ये सांगायच्या, असे हे आहे. पहिल्या वर्षात आमच्या सर्व योजना बंद करणारे सरकार आता त्याच योजनांचा विस्तार करून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतंय, अशीही टीका फडणवीस यांनी केली.
‘पाणचट, पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प’
राज्य सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प हा पंचसूत्रीचा विकासाच्या आधारावर नसून तो मांडल्यानंतर लक्षात येते की, पाणचट, पचपचीत आणि प्रतिगामी असा अर्थसंकल्प आहे. हा स्व-राज्याचा अर्थसंकल्प वाटत असून स्व-हिताचा अर्थसंकल्प आहे. आमच्या शेतकर्यांसाठी आम्ही खूप काही केले, असे सांगितले गेले, पण प्रत्यक्षामध्ये आर्थिक पाहणी अहवालात बघितले ही, कोरोना काळामध्ये शेतकरी खासगी सावकाराकडे वळला हे दिसून आले आहे. या शेतकर्यांच्या मदतीबाबत चकार शब्दसुद्धा या अर्थसंकल्पात काढला नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.