नवी मुंबई : बातमीदार
भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रान्स्फर घोटाळ्याची चौकशी व्हावी म्हणून आवाज उठवला, मात्र यातील दोषीवर कार्यवाही न करता उलटपक्षी राज्यातील सत्ताधार्यांनी सत्येचा दुरूपयोग करीत सूडबुद्धीने फडणवीस यांच्यावर नोटीस बजावून त्रास देणे सुरू केले आहे. याचा निषेध करीत नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत त्यांना जोरदार पाठिंबा दिला.
वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेल्या निषेध आंदोलनाचे नेतृत्व भाजप नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत यांनी केले. या वेळी संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी नोटीस फाडून आपला जाहीर निषेध व्यक्त केला. डॉ. रामचंद्र घरत म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी बजावलेली नोटीस म्हणजे एक राजकीय षड्यंत्र आहे. फडणवीस यांनी प्रत्येक वेळी महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. आघाडीच्या या कारवाईचा आम्ही निषेध करित आहोत.
या वेळी माजी महापौर जयवंत सुतार, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे, नवी मुंबई युवती मोर्चा अध्यक्ष सुहासिनी नायडू,महामंत्री कृष्णा पाटील, माजी नगरसेवक रवींद्र इथापे, उषा भोईर, माधुरी सुतार, अशोक गुरखे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.