भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र
मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असतात. दरम्यान, रविवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली. यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन सुरू केले. यावरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली होती, त्यांच्या टीकेला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारमध्ये दिवसरात्र तमाशा सुरू असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांच्या ट्विटला उत्तर देताना केशव उपाध्ये म्हणतात, खरोखरच कमाल आहे. पहा ना मंत्रालयात, विधान भवनात मुख्यमंत्री जातच नाहीत. तुम्ही स्वता कोणताही पुरावा हातात नसताना शिवसैनिकांची गर्दी करत वाट्टेल ते आरोप करण्याची प्रेस घेता. महाराष्ट्रातील सरकारमध्ये दिवसरात्र तमाशा सुरू आहे. लोकशाहीत सगळे समान तर ही विशेष वागणूक कशाला? असे उपाध्ये म्हणाले.
दुसर्या एका ट्विटमध्ये उपाध्ये म्हणतात की, ’महावसुली आघाडी सरकारने पोलिसांचा गैरवापर करीत विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न केला, तरी ना जनता शांत बसणार ना देवेंद्रजी भ्रष्ट्राचार काढण्याच थांबणार. या ट्विटसोबत त्यांनी आय सपोर्ट देवेंद्र असा हॅशटॅगही वापरला.
मविआ सरकार कौरवांचेही बाप, सुधीर मुनगंटीवार यांची टीका
चंद्रपूर : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ठाकरे सरकारमधील घोटाळे बाहेर काढत असल्याने अस्वस्थ झालेले सरकार सुडबुद्धीने फडणवीसांनाच नोटीस पाठवित आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी फडणवीसांना आलेल्या नोटीसचा निषेध करून राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मविआ सरकार कौरवांचेही बाप असल्याची टीका केली आहे.
चंद्रपुर येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. या वेळी ते म्हणाले की, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांना चौकशीच्या फेर्यात अडकवणे म्हणजे कट-कपट कारस्थान यांचा उगम आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात घोटाळेबाजांना उघडे करणार्या फडणवीस यांच्यासारख्या विरोधी नेत्यांना दिली जाणारी वागणूक संतापजनक आहे. हे सरकार इंग्रजांनाही लाजवेल अशा पद्धतीने वागत असल्याचा घणाघातही सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.