Breaking News

कामोठ्यातील पाणीप्रश्नी भाजप आक्रमक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर काढणार मोर्चा

पनवेल ः वार्ताहर

कामोठे वसाहतीला कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने तेथील रहिवाशी संतप्त झाले आहेत. या पाणी प्रश्नावरून सोमवारी (दि.14) भाजप नगरसेवक विजय घरत, विजय चिपळेकर व सहकारी कामोठे वसाहतीमधील सिडको कार्यालयात आक्रमक झाले. पाण्याचा प्रश्न तातडीने न सोडवल्यास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल. तसेच मंत्रालयावरसुद्धा याबाबत धडक मारण्यात येईल, असा इशारा नगरसेवक विजय घरत यांनी दिला आहे.

कामोठे वसाहतीमधील सेक्टर 34, सेक्टर 6, सेक्टर 18 तसेच इतर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांना पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे. या वसाहतीला 40 एमएलडी पाण्याची गरज असताना सध्या केवळ 30 ते 32 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी पूर्णतः सिडको जबाबदार असल्याचे मत नगरसेवक विजय चिपळेकर यांनी व्यक्त केले आहे.

या संदर्भात सोमवारी नगरसेवक विजय घरत, नगरसेवक विजय चिपळेकर, युवानेते हर्षवर्धन पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नाना मगदूम व सेक्टर 34, सेक्टर 6, सेक्टर 18 मधील नागरिकांनी पाण्याच्या अनागोंदी कारभाराचा जाब विचारण्यासाठी सिडको कार्यालयात धाव घेतली असता, तेथे एकही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे नागरिकांचा संताप अजूनच तीव्र झाला आहे. येथील अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराचासुद्धा नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आगामी काळात सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास सिडकोविरुद्ध धडक मोर्चा काढण्याचा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला आहे.

कामोठे वसाहत चोहोबाजूने पसरत असून आवास योजना व इतर सोसायट्या मोठ्या प्रमाणात येथे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी काळातही पाणी समस्या भेडसावणार असून यासाठी 11 नगरसेवकांनी वारंवार सिडकोकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनसुद्धा सिडको या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने आता आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येणार आहे. -विजय घरत, नगरसेवक

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply