अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील पोलीस गोळीबार सरावावेळी झाडण्यात आलेल्या बंदुकीच्या गोळ्या कार्ले गावातील दोन घरांमध्ये घुसल्याची घटना गुरुवारी (दि. 27) घडली. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही, मात्र ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करीत गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत.
परहूरपाडा येथे गुरुवारी सकाळपासून पोलिसांचा गोळीबार सराव सुरू होता. दुपारी 12.30 ते 1च्या दरम्यान दोन डोंगर पार करून एक गोळी मंगेश नाईक यांच्या घराच्या पत्र्यावरून लादीवर पडली, तर दुसरी गोळी प्रफुल्ल पाटील यांच्या पत्र्यावरून भिंतीवर आपटून अंगणात जमिनीवर पडली. या वेळी पाटील यांच्या आई भिंतीला टेकून बसल्या होत्या. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.
अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथे पोलिसांचा गोळीबार सराव क्षेत्र आहे. नवी मुंबई, ठाणे येथील पोलीस बंदुकीतून गोळीबार करण्याचा सराव करण्यासाठी परहूर पाडा येथे येत असतात. या सरावातील गोळीबाराच्या गोळ्या काही वेळा मान तर्फे झिराड ग्रामपंचायत हद्दीतील कार्ले गावात येतात. अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस, जिल्हा प्रशासन यांना अनेक निवेदने दिली. त्यानंतर गोळीबार सरावाच्या ठिकाणी 20 फुटाची भिंत बांधण्यात आली, पण तरीदेखील गोळ्या कार्ले गावात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …