रोहे : प्रतिनिधी
रब्बी हंगामात रोहा तालुक्यात प्रामुख्याने भातशेती, कडधान्ये व भाजीपाला पिके घेतली जातात. या वर्षी कडधान्यांचे पिक बर्यापैकी बहरले आहेत. मात्र भातशेती कमी होताना दिसत आहे. कमी खर्चात चांगले उत्पादन निघत असल्याने रोहा तालुक्यातील शेतकरी कडधान्य व भाजीपाला पिके घेण्यास प्राधान्य देत आहेत. तालुक्यात प्राधान्याने वाल, चवळी, मटकी, हरभरा, तूर आदी कडधान्ये तसेच माठ, कारली, शिराळी, वांगी, मिरची आदी भाजीपाला पिके घेतली जातात. बाहे गावाची मिरची आणि किल्ले परिसरात भाजी प्रसिध्द आहे. त्यातून शेतकर्यांचे अर्थकारण सुधारत आहे. पुर्वी रोहा तालुक्यात कालव्यांचे जाळे होते. कालव्याच्या पाण्याच्या माध्यमातून रोहा तालुक्यात उन्हाळी भात शेती केली जात होती. कोलाड, खांब, धाटाव, देवकान्हे, पिंगळसई यासह तालुक्यातील काही भागात मिळून सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भातशेती केली जात होती. मात्र आता कालव्यांचे पाणी बंद असल्याने या परिसरात भात शेती केली जात नाही. काही ठिकाणी कुंडलिका नदीच्या पाण्यावर भातशेती केली जात असली तरी आता रब्बी हंगामातील भातशेतीचे क्षेत्र घटत असल्याचे दिसून येत आहे. या वर्षी रब्बी हंगामात तालुक्यातील 240.50 हेक्टरावर भात लागवड करण्यात आली आहे. रोहा तालुक्यात या वर्षी वाल (1050 हेक्टर), चवळी (175 हेक्टर), मटकी (115 हेक्टर), मुग (786.20), हरभरा (147.38), तूर (367.70 हेक्टर) आदि कडधान्यांची लागवड करण्यात आली असल्याचे तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी सांगितले. बाहे, चणेरा, किल्ला आदी भागासह तालुक्यात यावर्षी एकूण 450 हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे.