Breaking News

जिल्हा ग्रंथालय संघाची माथेरान ग्रंथालयास भेट

कर्जत : बातमीदार

माथेरान नगरपालिकेचे ग्रंथालय 125 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या प्रतिनिधींनी नुकताच माथेरान ग्रंथालयास भेट दिली. ग्रंथालयाची हेरिटेज वास्तू आणि अनमोल पुस्तकांचा ठेवा पाहून ग्रंथालय संघाच्या प्रतिनिधींनी नगरपालिकेचे कौतुक केले. ब्रिटिशांनी 1897 साली माथेरानमध्ये ग्रंथालय सुरू केले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या ग्रंथालयात 12 हजारापेक्षा जास्त पुस्तके आहेत.  कोविड काळात लॉकडाऊनमुळे वाचकसंख्या घटली होती. पण याच काळात या ग्रंथालयाच्या वास्तूचे रुपडे बदलण्यात नगरपालिकेला यश आले. यावर्षी हे ग्रंथालय 125 व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे, कार्यवाह संजय भायदे, खजिनदार राजेश खेडेकर, रामदास गायकवाड यांनी माथेरानच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांची ग्रंथालयात भेट घेतली. यावेळी या ग्रंथालयात काय बदल अपेक्षित आहेत, यावर चर्चा झाली. जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे यांनी पुस्तकांचा अनमोल ठेवा जपल्याबद्दल नगरपालिकेचे कौतुक केले. या ग्रंथालयास लागेल ती मदत करण्यास रायगड जिल्हा ग्रंथालय संघ तयार असल्याचे यावेळी बोंदार्डे यांनी स्पष्ट केले. ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 23 मे रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी सांगितले.तसेच या ग्रंथालय डिजिटल कसे होईल याकडे पुरेपूर लक्ष दिले जाणार आहे.स्थानिकासह पर्यटकही या ग्रंथालयाकडे कसे आकर्षित होतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे ही मुख्याधिकार्यांनी स्पष्ट केले. या वेळी क्लार्क रत्नदीप प्रधान, प्रविण सुर्वे, लेखापाल अंकुश इचके, अन्सार महापुळे, संदेश कदम उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply