Breaking News

छोट्या धंद्यांना बळ देण्यासाठी अनोखा प्रवास

आम्ही झिलबाम बॉर्डरवर निघालो होतो. नुमडा या मणीपूर राज्यातील  एका गावाजवळ रात्री 8 वाजता पोहचलो. सगळे बंद झाले होते, कारण  नॉर्थ ईस्टमध्ये थंडीत सूर्यास्त लवकर म्हणजे 3-4 वाजताच होतो. रस्त्यात एका ठिकाणी काही पोलिस होते. त्यांच्या जवळ राहण्याची सोय कोठे होईल चौकशी केली. त्यांनी प्रथम आमचीच चौकशी केली  आम्ही टुरिस्ट असल्याची खात्री  पटल्यावर येथे सोय नसल्याचे सांगितले. त्यांना आम्ही पुन्हा विनंती केल्यावर त्यांनी गावात एका ठिकाणी फोन लावला. मग एका उंचावरच्या ठिकाणी गाडी जात नसल्याने आमची बॅग  स्वत: हातात घेऊन आम्हाला तेथे घेऊन गेले. एका पत्र्याच्या घरात आमची सोय करण्यात आली. मणिपूर पोलिसांनी त्या अंधार्‍या रात्री भाषेचा प्रॉब्लेम असताना ही आमच्या सारख्या अनोळखी माणसांना केलेली मदत आम्ही कधीच विसरू शकणार नसल्याचे द ग्रेट इंडियन ट्रॅव्हलचे  कौस्तव घोष व लक्ष्मी सोरते सांगत होत्या.

सपोर्ट युअर बिझनेस या आशयाच्या माध्यमातून सर्व पार्श्वभूमीतील लोकांना सक्षम करणे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या व्यवसायाचा प्रचार आणि वाढ करण्यासाठी नेटवर्क स्थापन करण्याचे ध्येय आहे. जे एक नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे, ज्याचे नेतृत्व संस्थापक संचालक रिंकी वनमोरे, मदिहा शेख आणि कौस्तव घोष करतात. मोहिमेचे कारण लहान व्यवसायांना पाठिंबा देणे आणि त्यांचे ब्रँड आणि प्रयत्न ओळखणे हे असून द ग्रेट इंडियन ट्रॅव्हल या मोहिमेमध्ये एक संघ असून त्यामध्ये कौस्तव घोष हे संस्थापक, लक्ष्मी सोरते सह-संस्थापक, आर्या नायर जनसंपर्क आणि विपणन, भाविक देशमुख नेव्हिगेटर, अनित कौर बंगा विचारवंत, संशोधन आणि विकास, रितांशू शर्मा मीटिंग समन्वयक, सावराब समता वेबसाइट विकासक, तरुण मिश्रा ग्राफिक डिझायनर/ व्हिडीओ मेकर, अभिषेक वाळेकर वाहन ब्रँडिंग, शीतल सिरसीकर वाहन ब्रँडिंग म्हणून काम पाहतात.

कौस्तव घोष मूळचे कलकत्ताचे असले तरी आता खारघरचे  रहिवासी आहेत. ते स्वत: इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. त्यांनी एनजीओमध्येही काम केले आहे.  मार्केटिंग सल्लागार म्हणूनही काम करत होते. लक्ष्मी सोरते या फ्री लान्सर कमर्शियल आर्टिस्ट आहे. दोघांना फिरण्याची खूप आवड असल्याने त्यांना संपूर्ण देश सोबत फिरायचा होता, पण तो एका उद्देशाने फिरायचा होता. कोरोना काळात त्यांनी स्वत: छोट्या धंद्यांना आलेल्या अडचणींचा अनुभव घेतल्याने त्यांनी  छोट्या धंद्यांचा प्रचार आणि वाढ करण्यासाठी फिरण्याचे ठरवून  द ग्रेट इंडियन ट्रॅव्हल ही 101 दिवसांची रोड ट्रिप मोहीम काढली. कोविडमुळे प्रभावित झालेल्या लहान आणि सूक्ष्म व्यवसायांना मदत करण्यासाठी, करण्याचे ठरवले. सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील  संस्कृती, परंपरा, रितीरिवाज, पाककृती अशा विविध बाबतीत ही ट्रीप प्रेरक ठरली. एनजीओ व स्टार्ट अप्स आणि लहान व्यावसायिक समुदायांसारख्या विविध आंतरराष्ट्रीय संस्थांमधील 800पेक्षा जास्त समविचारी लोकांच्या यावेळी भेटी झाल्या व त्यामध्ये एकमेकांचे विचार समजून घेता आले.

कौशल व लक्ष्मी यांना द ग्रेट इंडियन ट्रॅव्हलसाठी होंडा कंपनीने गाडी दिली होती. बाकी खर्च त्यांनी आपल्या स्वत:च्या बचतीतून केला. काही ठिकाणी रोटरी सारख्या संस्थांनी मदत केली. ते 28 राज्य आणि 5 केंद्रशासीत प्रदेश फिरले. सुरुवात कोकणातून केली. कोकणी  मसाले, लोणची व सरबते त्यांना आवडली. तेथील माणसांची पाहुण्यांना मदत करण्याची वृत्ती लक्षात राहिल्याचे ते सांगतात. छत्तीसगड  म्हटला की, आपल्या समोर नक्षलवादी येतात. अनेकांनी तेथे कशाला जाता सांगितले तरीही अनुभव घ्यायचा ठरवून आम्ही गेलो. आम्ही तेथील एका एनजीओमार्फत जंगलात एका आदिवासी कुटुंबासोबत  राहिलो.त्यांच्याकडे औस्ट्रेलियन फेमस शेफ गार्ड्न रामसे, बिल गेटची मुलगी ही येऊन राहिली होती. त्यांनी आम्हाला सर्वसाधारण टुरिस्ट जाऊ शकत नाहीत  त्याठिकाणी नेले तो अनुभव रोमांचकारी होता.

जम्मू काश्मीरमध्ये राहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरुन ओळख  झालेल्या एका मुस्लिम कुटुंबाने आमंत्रण दिले होते. त्या ठिकाणी  रस्ता नीट नाही. तिकडे फारशी माणसे नाहीत तुम्ही जाऊ नका असा आम्हाला सल्ला मिळाला, पण तरीही आम्ही तेथे गेलो. अनोळखी शफ्तंजी कुटूंबासोबत एक रात्र राहिलो होतो. त्या वेळी बर्फ पडत असल्याने थंडी होती. एका खोलीत बुखारी (शेकोटी) होती. त्या खोलीत गरम होते तेथे बसून त्यांच्या कुटुंबासोबत गप्पा मारल्या. मीठ घातलेला चहा घेतला. त्यांची मेहमान नवाजी अनुभवली दुसर्‍या दिवशी  सकाळी निघाल्यावर त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. ते म्हणाले, आम्ही शहरापासून लांब राहतो आमच्यावर काश्मिरी हा शिक्का आहे, त्यामुळे आमच्याकडे कोणी येत नाही. आमचे नातेवाईक ही येत नाहीत. आमच्या मुली बाहेर जाऊ शकत नाहीत  अशावेळी तुम्ही आमच्याकडे येऊन राहिलात हे आमच्यासाठी खूप आहे. त्यांचा पाहुणचार आम्ही कधीच विसरू शकणार नसल्याचे लक्ष्मी सोरतेनी सांगितले.

द ग्रेट इंडियन ट्रॅव्हल ही 101 दिवसांची ट्रीप केल्यावर लक्षात येते की, आपल्या देशात अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी छोट्या उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे.  त्यासाठी शासनाने आमच्यासारख्या फ्लॅटफार्मना बळकटी दिली पाहिजे. आम्ही लोकांना एकत्र आणतोय त्यांना मार्केट मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्हाला शासनाने सहकार्य केले तर खूप काही होऊ शकते असे कौशल घोष यांना वाटते.

-नितीन देशमुख, खबरबात

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply