208 शाळांत केंद्रे; 36,821 जणांना पहिली तर 6,524 जणांना दुसरी पहिली मात्रा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
गेल्या काही दिवसांपासून शांत झालेल्या कोरोनाच्या प्रादूर्भावाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका प्रशासनाने 12 ते 14 वयोगटातील लसीकरणावर भर दिला असून मुलांच्या लसीकरणाला वेग आला आहे. यासाठी पालिकेकडे 92,800 लसमात्रा मिळाल्या असून सुमारे 43,345 लसमात्रांचे लसीकरण केले आहे. यासाठी पालिका प्रशासनाने महापालिकेच्या रुग्णालयांसह पालिका व खासगी शाळा मिळून 208 शाळांत लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत.
16 मार्चपासून या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले असून 47,459 लाभार्थी असून पहिली मात्रा 36,821 तर दुसरी मात्रा 6,524 जणांना देण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेने लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन केल्यामुळे 18 वर्षांवरील वयोगटात लसीकरणाचे पहिल्या व दुसर्या मात्रेचे 100 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. तसेच 15 ते 18 या वयोगटातील मुलांचे लसीकरणही पूर्ण केले आहे. आता 12 ते 14 वयोगटातील लसीकरणावर भर दिला आहे.
पहिल्या मात्रेचे लसीकरण शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर गेल्या आठवड्यात बुधवारपासून दुसरी लसमात्रा देणे सुरू केले. मात्र पहल्या दिवशी एकही लाभार्थी लसीकरण केंद्राकडे फिरकला नाही. त्यानंतर पुढील दोन ते चार दिवस अत्यंत कमी लसीकरण होत होते. मात्र देशात पुन्हा करोना रुग्णवाढीचे संकेत मिळाल्यानंतर या लसीकरणाला गर्दी होऊ लागली आहे. गुरुवारपर्यंत (दि. 21) 6,524 जणांना दुसरी लस देण्यात आली आहे.
यासाठी पालिका प्रशासनाने महापालिकेच्या रुग्णालयांसह पालिका व खासगी शाळा मिळून 208 शाळांत लसीकरण केंद्रे सुरू केली असून लसीकरणाला वेग आला आहे.
लहान मुलांच्या वेगवान लसीकरणासाठी पालिकेने 204 शाळांमध्ये लसीकरणाचे नियोजन केले असून पालिकेला आतापर्यंत 92,800 कोर्बेवॅक्स लसमात्रा मिळाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून दुसर्या लसमात्रेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. -डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख