कर्जत : बातमीदार
तालुक्यातील गारपोली येथे मंगळवारी (दि. 26) रात्री दुकानातील सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण दुका जळून खाक झाले आहे. कल्याण -कर्जत राज्यमार्गावर गारपोली गावाशेजारी जीवन शिंदे यांचे अल्पोपहार आणि चहाचे दुकान आहे. या दुकानात नाश्ता तयार करण्यासाठी असलेली शेगडी व सिलिंडरसह तेल असे ज्वलनशील साहित्य होते. मंगळवारी रात्री दुकान बंद करताना शिंदे यांनी देवघरात लावलेला दिवा नेहमीप्रमाणे तेवत ठेवला होता. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास त्या दुकानातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. बाजूलाच प्रतीक्षा लॉनमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. आगीचा भडका उडताच अवघ्या दोन मिनिटांत शेकडो लोक तेथे पोहचले. आगीचा भडका एवढा मोठा होता की, आग विझवणे सहज शक्य नव्हते. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. यात 40-45 हजारांचे नुकसान झाले आहे. ही आग लागली त्या ठिकाणापासून 50 मीटर अंतरावर मुख्य रस्त्यावर मागील वर्षी मार्च महिन्यात रिक्षा आणि कार यांच्या धडकेत रिक्षा जळून तिघांचा होरपळून मृत्यू झाला होता.
RamPrahar – The Panvel Daily Paper