अन्यथा भाजप मोठे आंदोलन करणार; युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग यांचा इशारा
धाटाव ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या माध्यमातून मार्च महिन्यात ग्राहकांना दोन बिले अदा करण्यात आलेली आहेत. त्यातील एक बिल हे अतिरिक्त अनामत सुरक्षा ठेव रक्कम असल्याबाबत दिले गेले आहेत. त्यामुळे सर्वच ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झालेला आहे. आधीच महागाईच्या खाईत सामान्यांना लोटल्यानंतर अतिरिक्त सुरक्षा ठेव रकमेच्या नावाखाली करण्यात येणारी लूट राज्य शासनाने थांबवावी, अन्यथा भाजपच्या वतीने मोठे जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष घाग यांनी निवेदनातून दिला आहे. बुधवारी (दि. 27) रोहा वीज वितरण कार्यालयात याबाबत निवेदन देण्यात आले. या वेळी रोहा तालुका युवा मोर्चाध्यक्ष राजेश डाके, शहर भाजप नेते शैलेश रावकर, तालुका कामगार आघाडी अध्यक्ष विलास डाके यांसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. एकीकडे महावितरण विभागाच्या माध्यमातून ग्राहकांकडून मीटरची सुरक्षा ठेव रक्कम असतानाही अशा पद्धतीने सामान्य जनतेच्या खिशातून हे सरकार पैसे लुटत आहे. त्यांनी तो प्रकार थांबवावा अथवा सामान्य जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेलच, परंतु भारतीय जनता पक्ष अशा लुटारू महावितरणाच्या कारभाराविरुद्ध आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाने याबाबत आवाज उठविताच, महावितरणच्या रोहा कार्यालयातील ज्युनियर अभियंता निकेतन फलके व केरू पाटील यांनी, ज्या ग्राहकांना अशा पद्धतीने बिल दिले गेले असतील तर ती टप्प्याटप्प्याने भरावी, असे सांगितले आहे.