रसायनी ः बातमीदार
कराडे खुर्द ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले असून थेट सरपंचपदाच्या उमेदवार भारती हेमंत चितळे या निवडून आल्या आहेत. प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार विजय मुरकुटे यांना निसटता पराभव पत्करावा लागला.
कराडे खुर्द ग्रामपंचायत निवडणूक मतदान रविवार (दि. 23) होऊन सोमवारी पनवेल तहसिल कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यावेळी कराडे खुर्द ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदी तिरंगी लढत असताना भाजपच्या भारती हेमंत चितळे या निवडून आल्या. परंतु प्रभाग दोनमधील विजय मुरकुटे यांचा निसटता पराभव झाल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष न करता भाजपच्या पार्टी कार्यालयात येऊन वरिष्ठांची भेट घेतली. खर्या अर्थाने कराडे खुर्द ग्रामपंचायतीचा विजय मुरकुटे यांच्यामुळे असल्याचे भाजप विभागप्रमुख किरण माळी यांनी बोलताना सांगितले. कराडे खुर्द ग्रामपंचायतीत भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विभागप्रमुख किरण माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय मुरकुटे यांनी अथक परिश्रम घेतले आहे. त्याने स्वत:च्या प्रचाराकडे दुर्लक्ष करून सरपंच व इतर सदस्यांच्या प्रचारावर अधिक लक्ष घातले. या निवडणुकीत जांभिवली ग्रामपंचायतीवरही थेट सरपंचपदी भाजपाच्या रिया कोंडीलकर या विजयी झाल्या आहेत.